logo

प्रफुल्ल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पन्हाळा येथे गझल संमेलन

नांदेड - कोरपना (जि.) चंद्रपूर येथील गझल मंथन साहित्य संस्थेच्यावतीने पन्हाळा (जि. कोल्हापूर) येथे एक दिवसीय मराठी गझल संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व दिनी होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध गझलकार नांदेडचे भूमिपूत्र प्रफुल्ल कुलकर्णी हे आहेत.

रविवारी (दि. 25) सकाळी 10 वाजता पन्हाळा येथे मराठी गझल संमेलनाला सुरुवात होणार आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्ष डाॅ. स्नेहल कुलकर्णी आहेत. तर प्रसिद्ध गझलकार डाॅ. मंदार खरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे सहसचिव एन.आर. भोसले, गझलकार प्रदीप ततळेकर, भिमराव धुळबुळू यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. यावेळी गझलयात्री या गझल संग्रहाचे प्रकाशन होणार आहे. तीन सत्रात होणाऱ्या या संमेलनात पाच गझल मुशायरे होणार असून राज्यभरातील विविध गझलकार यात सहभागी होत आहेत.

संमेलनाचे अध्यक्ष प्रफुल्ल कुलकर्णी हे नांदेडचे भूमिपूत्र असून 1984-85 पासून ते कविता करतात. परंतु पुढे त्यांना गझल रचनेत प्रसिद्धी मिळाली. कविताश्री, कवितारती महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ यासह अनेक दर्जेदार प्रकाशनांनी त्यांच्या गझलांना व्यापक प्रसिद्धी दिली. या माध्यमातून ते महाराष्ट्राला परिचित झाले. विविध मान्यवरांनी वेगवेगळ्या प्रकाशनांमध्ये गझलांबाबत जी सदरं चालवली, त्यातही प्रफुल्ल कुलकर्णी यांच्या गझला वाचकप्रिय झाल्या. बहुतेक प्रातिनिधिक गझल संग्रहामध्ये कुलकर्णी यांची हजेरी आहे. राज्यात विविध ठिकाणी प्रतिष्ठा पावलेल्या कवी व गझल संमलनात ते नियमित उपस्थिती लावतात. अनेकवेळा त्यांनी अध्यक्षपद सुद्धा भूषविले आहे.

मराठवाड्याची मराठी गझल हा मराठवाड्यातील गझल चळवळीचा आढावा घेणारा त्यांचा अभ्यासपूर्ण लेख वाचकांच्या पसंतीस उतरला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सुद्धा प्रफुल्ल कुलकर्णी यांच्या गझलेचा समावेश झालेला आहे. गझलमंथ साहित्य संस्थेच्या जालना येथील एक दिवसीय गझल संमेलनाचे उद्घाटन करण्याचा मान त्यांना यापूर्वी मिळाला आहे. यात्री हा कवितासंग्रह आणि एक आणखी मजला हा मराठी गझल संग्रह नावावर असलेल्या या हरहुन्नरी गझलकाराने दोन एकांकिकांचे लेखन केले असून एका नाटकातील अतिरिक्त संवाद लेखन व दोन नाटकांसाठी गीत लेखन सुद्धा केले आहे.

0
35 views