logo

चिखली–मेहकर मार्गावर रोडरॉबरीचा प्रयत्न; दगडफेकीने जिल्ह्यात दहशत


प्रतिनिधी जुबेर शाह

साखरखेर्डा । चिखली–मेहकर रोडवर लव्हाळा नजीक पाटोदा फाट्यावर काल दि. १६ जानेवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हायवेवर दगड टाकून चारचाकी वाहने अडवण्याचा व रोडरॉबरीचा प्रयत्न केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, दि. १६ जानेवारी रोजी रात्री चिखली–लव्हाळा मार्गावर पाटोदा फाट्यावर चोरट्यांनी प्रवाशी निवाऱ्यातील बाकडे रस्त्यावर आडवे टाकून वाहने थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत गाड्या न थांबवता पुढे नेल्या. यामुळे चोरट्यांनी प्रवाशी निवाऱ्याच्या आडून या मार्गावरून जाणाऱ्या सुमारे दहा ते पंधरा वाहनांवर जोरदार दगडफेक केली.

दरम्यान, सैलानी येथे दर्शनासाठी जात असलेल्या साखरखेर्डा येथील बाबुसेठ कुरेशी यांच्या वाहनाचे टायर दगडफेकीत फुटले. मात्र वाहनात क्रुझरमधून आठ ते दहा जण असल्याचे दिसताच चोरट्यांचा रोडरॉबरीचा प्रयत्न फसला.

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गजानन करेवाड, दुय्यम ठाणेदार गणेश डोईफोडे, पो. कॉ. विनायक परिहार यांच्यासह साखरखेर्डा, चिखली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबविली. मात्र चोरटे पसार झाले.

रोडरॉबरीचा प्रयत्न फसल्याने आजूबाजूच्या गावांत चोरीचे प्रकार घडू शकतात, या शक्यतेने ठाणेदार गजानन करेवाड यांनी परिसरातील पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, पाटोदा मार्गावर असलेल्या सवडद येथील ग्रामविकास अधिकारी गौतम गवई यांच्या कोंबड्यांची चोरी झाल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला असून याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ठाणेदार गजानन करेवाड यांनी रात्रभर घटनास्थळी तळ ठोकल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र या घटनेमुळे जिल्ह्यात रात्री वाहनाने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शिस्तप्रिय पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या पारदर्शक कारभाराला चोरट्यांनी जणू खुले आव्हान दिल्याची चर्चा नागरिकांत होत आहे.

दरम्यान, वाहनचालकांनी रात्रीच्या वेळी रस्त्यावर वाहन थांबवू नये, असे आवाहन ठाणेदार गजानन करेवाड यांनी केले आहे.

16
2187 views