logo

इतिहासाच्या नावावर बुलडोझर फिरवणाऱ्यांना इशारा अहिल्यादेवींच्या वारशावर घाला म्हणजे लोकशाही मूल्यांचा ऱ्हास-संदीपजी घोरपडे

इतिहासाच्या नावावर बुलडोझर फिरवणाऱ्यांना इशारा

अहिल्यादेवींच्या वारशावर घाला म्हणजे लोकशाही मूल्यांचा ऱ्हास-संदीपजी घोरपडे

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
पुरातत्त्व विभागाने जतन केलेल्या आणि आजही कोट्यवधी भारतीयांच्या हृदयसिंहासनावर विराजमान असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना इतिहासातून पुसून टाकण्याचा अधिकार कोणालाही नाही, असा ठाम व संतप्त सूर ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांनी व्यक्त केला.
या भारतभूमीवर कोट्यवधी वर्षांच्या इतिहासात असंख्य पराक्रमी, विचारवंत व राज्यकर्ते होऊन गेले. काहींनी स्वतःचा स्वार्थ साधला, तर काहींनी लोककल्याणाची दीपस्तंभवत परंपरा निर्माण केली. अमरत्व कुणालाही मिळाले नाही; परंतु काही मोजकी व्यक्तिमत्त्वे काळाच्या प्रवाहातही आज समाजाला दिशा व प्रेरणा देत राहिली. त्या महान विभूतींमध्ये अग्रस्थानी असलेले नाव म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर.
बालपणापासून अखेरच्या श्वासापर्यंत अहिल्यादेवींचे जीवन शुद्ध चारित्र्य, अध्यात्मिक पवित्रता आणि लोककल्याण या सूत्राभोवती गुंफलेले होते. त्यांच्या हातून घडलेले प्रत्येक कार्य म्हणजे आजच्या भाषेत सांगायचे तर शाश्वत विकासाचा आदर्श नमुना होता. जगभरातील राजे-राण्यांच्या राज्यकारभाराचा अभ्यास करणाऱ्या इंग्लंडमधील संशोधकांनीही अहिल्यादेवींच्या कार्याची विशेष नोंद करून ठेवली आहे. एका संशोधन लेखात नमूद केले आहे की, जगातील सर्वात साधे सिंहासन अहिल्यादेवींचे होते; मात्र ते सिंहासन जनतेला अत्यंत प्रिय होते.
याचे कारणही तितकेच विलक्षण होते. राजदरबारात राजा व सामान्य नागरिक यांच्यातील दरी मिटवण्यासाठी अहिल्यादेवींनी अठरा फूट लांबीची एकच गादी तयार करून घेतली होती. त्या गादीवर राणी स्वतः बसत आणि कोणताही प्रजाजन त्याच गादीवर बसून आपले दुःख, तक्रार थेट मांडू शकत असे. या समतेच्या भावनेमुळे अहिल्यादेवी जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करू शकल्या. परकीय संशोधकांनाही हा अनुभव आश्चर्यचकित करणारा वाटला आणि म्हणूनच तो इतिहासात नोंदवला गेला.
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत अहिल्यादेवींनी आपल्या खाजगी संपत्तीतून घाट, मंदिरे, धर्मशाळा, रस्ते, जलव्यवस्था उभारली. शेकडो वर्षे ऊन-वारा-पावसाचा मारा सहन करूनही ही कामे आजही ताठ मानेने उभी आहेत. काशीमध्ये आपण पुण्य कमवायला जातो, तेथे उभे असलेले घाट, धर्मशाळा हे अहिल्यादेवींनी दिलेल्या इतिहासाची साक्ष देतात.
अशा महान कार्याचा विध्वंस करून केवळ स्वतःचे नाव कोरण्याच्या उद्देशाने बुलडोझर चालवला जात असेल, तर तो क्षणिक विकासाचा अतिरेकी अहंकार असल्याची तीव्र टीका घोरपडे यांनी केली. अशा कृतीचा मी जाहीर निषेध करतो आणि समस्त धनगर समाजासह माझ्याही भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
धनगर समाज हा संख्येने जरी कमी वाटत असला, तरी जल, जंगल आणि जनावरांशी नाळ जुळवून जगणारा प्रचंड सांस्कृतिक व नैतिक संपत्तीचा वारसदार समाज आहे. या समाजातूनच अहिल्यादेवींसारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व घडले. त्यांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातील विविध जाती-धर्म-पंथातील लोकांनी अभिवादन केले होते. मात्र त्यांच्या शाश्वत विकासाच्या कार्यावर घाला घालून तो इतिहास उद्ध्वस्त केला जात असल्याने अतिशय दुःख होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
अहिल्यादेवींनी उभारलेली हेमाडपंथी मंदिरे, नद्यांवरील घाट, प्रवाशांसाठी धर्मशाळा, शेतकऱ्यांसाठी पाणीपुरवठ्याच्या पाठचाऱ्या—या सर्व कामांवर कुठेही “अहिल्यादेवी निर्मित” असा शिलालेख नाही. हेच त्यांचे मोठेपण होते. मात्र आज एखाद्या खासदाराने आपले नाव लावण्यासाठी अशी कामे उद्ध्वस्त करणे हा कोतेपणा भारतीय समाज स्वीकारू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
शेवटी त्यांनी देशवासियांना आवाहन केले की, आज अहिल्यादेवींना नामशेष करण्याचा प्रयत्न करणारी प्रवृत्ती उद्या देशातील विविधतेलाच संपवू पाहत आहे. राष्ट्रनिर्मितीत ज्यांनी योगदान दिले, त्यांचे श्रेय नाकारून स्वतःला मोठे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. यापासून सर्वांनी बोध घ्यावा आणि राजमाता अहिल्यादेवींच्या शाश्वत विकासाच्या संकल्पनेचे रक्षण करण्यासाठी पुन्हा एकदा एकजुटीने उभे राहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांनी केले.

1
1121 views