
अहमदपूर जि.प . व प . स . साठी प्रशासन सज्ज . २०० केंद्रावर 1 लाख 60 हजार 693 मतदार मतदानाचा हक्क बजावणार .अहमदपूर निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; २०० केंद्
अहमदपूर निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; २०० केंद्रांवर होणार मतदान
उपविभागीय - डॉ .मंजूषा लटपटे .
अहमदपूर
( शिवाजी श्रीमंगले विशेष प्रतिनिधी ) आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी अहमदपूर तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि १२ पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत असून, एकूण २०० मतदान केंद्रांवर १ लाख ६० हजार ६९३ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या एकूण मतदारांमध्ये ८३ हजार ९४६ पुरुष आणि ७६ हजार ७४७ महिला मतदारांचा समावेश असून, इतर मतदारांची नोंद झालेली नाही. प्रशासनाकडून गट आणि गणनिहाय मतदारसंख्या, आरक्षण तसेच मतदान केंद्रांची अंतिम आकडेवारी आता जाहीर करण्यात आली आहे.
तालुक्यातील खंडाळी, हाडोळती, शिरूर ताजबंद, अंधोरी, किनगाव व सावरगाव रोकडा हे प्रमुख जिल्हा परिषद गट असून प्रत्येक गटाची स्थिती प्रशासनाने स्पष्ट केली आहे. खंडाळी गटात खंडाळी व उजना या गणांचा समावेश असून येथे २७ हजार ६५ मतदार आहेत, तर या गटासाठी ना.मा.प्र. महिला आरक्षण लागू करण्यात आले आहे. हाडोळती गटात हाडोळती व कुमठा बु. गणांचा समावेश असून येथील २७ हजार ४०४ मतदारांसाठी सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला आरक्षण आहे. शिरूर ताजबंद हा तालुक्यातील सर्वाधिक मतदारसंख्येचा गट ठरला असून येथे २८ हजार ४७४ मतदार आहेत; यात वळसंगी व शिरूर ताजबंद गणांचा समावेश असून अनुसूचित जाती व सर्वसाधारण आरक्षण लागू आहे.
त्याचप्रमाणे अंधोरी गटात थोडगा व अंधोरी गण असून एकूण २४ हजार ८३५ मतदार आहेत, तर किनगाव गटात किनगाव व धानोरा बु. गणांचा समावेश असून येथे २५ हजार ६७२ मतदार आपली मते नोंदवतील. सावरगाव रोकडा गटात सावरगाव रोकडा व हिप्परगा काजळ हे दोन गण असून येथील २७ हजार २४३ मतदारांसाठी सर्वसाधारण तसेच अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती महिला आरक्षण ठेवण्यात आले आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत, पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सोयीसुविधा, कडक सुरक्षा व्यवस्था, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, ईव्हीएम मशीनची तपासणी आणि मतदार जनजागृती यावर विशेष भर देण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, तालुक्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
* जन जन की आवाज सोशल मीडिया अहमदपूर *