logo

भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री राज के. पुरोहित यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व मुंबई भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष राज के. पुरोहित यांचे आज मुंबईतील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. भाजपाच्या मीडिया सेलने त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली. त्यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक व उत्तर भारतीय समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
स्पष्टवक्तेपणा, आक्रमक शैली आणि अभ्यासू नेतृत्वासाठी ओळखले जाणारे राज के. पुरोहित हे विधानसभेत जनतेचे प्रश्न ठामपणे मांडणारे नेते म्हणून प्रसिद्ध होते. गिरगाव, काळबादेवी व मुंबादेवी परिसरातील स्थानिक प्रश्नांवर त्यांची मजबूत पकड होती. सामान्य कार्यकर्त्यांमध्ये ‘राजभाई’ म्हणून ते आपुलकीने ओळखले जात.
राज के. पुरोहित यांचे पार्थिव रविवारी, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत राजहंस बिल्डिंग, जी रोड, मरीन ड्राइव्ह, मुंबई येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनावर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. भाजपाने एक निष्ठावान, अनुभवी मार्गदर्शक गमावला असून मुंबईच्या विकासात व पक्षवाढीत त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात परिवार व मोठा चाहता वर्ग आहे.

0
0 views