
BLO च्या कामांमुळे शिक्षकांवर ताण; TET तयारीसाठी वेळ द्या – शिक्षक परिषदेची जोरदार मागणी
चंद्रपूर | 17 जानेवारी 2026
इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना देण्यात आलेली बी.एल.ओ. (BLO) कामे तात्काळ रद्द करून त्यांना पूर्णतः मुक्त करण्यात यावे, अशी ठाम व जोरदार मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, चंद्रपूर (प्राथमिक विभाग) यांच्याकडून करण्यात आली आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार, शिक्षण हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेले व पाच वर्षांपेक्षा अधिक सेवा असलेले इयत्ता 1 ते 8 चे शिक्षक यांनी 01 सप्टेंबर 2027 पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या कालावधीत TET उत्तीर्ण न झाल्यास संबंधित शिक्षकांच्या सेवा समाप्तीची कठोर कारवाई केली जाणार असल्याने शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षकांना शालेय अध्यापनाची जबाबदारी पार पाडून TET परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे अत्यावश्यक आहे. मात्र, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित BLO कामांमुळे शिक्षकांवर अतिरिक्त मानसिक व शारीरिक ताण पडत असून अभ्यासासाठी आवश्यक वेळ मिळणे कठीण झाले आहे, अशी भावना शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहे.
शिक्षक परिषदेनुसार, शिक्षण ही शिक्षकांची प्राथमिक जबाबदारी असून अशा संवेदनशील काळात त्यांच्यावर प्रशासकीय व निवडणूक कामांचा भार टाकणे हे अन्यायकारक, असमतोल व असंवेदनशील ठरते. त्यामुळे शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
परिषदेकडून शासनाकडे पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत —
• इयत्ता 1 ते 8 वीच्या सर्व शिक्षकांची BLO कामे तात्काळ रद्द करावीत
• शिक्षकांना पूर्णतः BLO कामातून मुक्त करावे
• TET परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक वेळ उपलब्ध करून द्यावा
या निर्णयामुळे शिक्षकांची नोकरी सुरक्षित राहून शिक्षणाच्या गुणवत्तेलाही चालना मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने व्यक्त केला आहे.
________________________________________