
शेंबा गावात सीसीटीव्ही बंद; चोरीच्या घटनांमध्ये वाढ, पोलिसांचा धाक हरवला.
शेंबा गावात सीसीटीव्ही बंद; चोरीच्या घटनांमध्ये वाढ, पोलिसांचा धाक हरवला
शेंबा प्रतिनिधी
शेंबा ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र सध्या हे कॅमेरे केवळ शोभेची वस्तू ठरत असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन हप्त्यांपासून, सुमारे पंधरा दिवसांपासून अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत.
गेल्या महिन्याभरात शेंबा परिसरासह आजूबाजूच्या खेड्यांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शेंबा गावातही मागील काही दिवसांत अनेक चोरीच्या घटना घडल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शेतीसंबंधी साहित्य, मोटार, केबल, पंप आदींच्या चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
शेंबा गाव बोरखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असले तरी चोरीच्या प्रकरणांचा तपास प्रभावीपणे होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अनेक प्रकरणे दाखल असतानाही तपासाला गती मिळत नसल्याने या परिसरात पोलिसांचा धाकच हरवल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, ग्रामपंचायतीकडूनही गावाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. गावकऱ्यांनी सरपंचांना विकासासंदर्भात प्रश्न विचारले असता केवळ “घरपट्टी भरा” असे उत्तर दिले जाते, मात्र गावाच्या सुरक्षेसह विकासकामांकडे कोणतेही ठोस लक्ष दिले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावातील सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने दुरुस्त करावेत, चोरीच्या घटनांचा तपास वेगाने करावा तसेच ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी शेंबा गावातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.