
अचलपूर पंचायत समिती अंतर्गत देवमाळी ग्रामपंचायत मध्ये प्रशासक यांचे मनमानी कारभार मुळे नागरिक त्रस्त
परतवाडा शहरालगत देवमाळी ग्रामपंचायतीतील प्रशासकाची मनमानी; सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त, आंदोलनाचा इशारा
परतवाडा
परतवाडा शहराला लागून असलेल्या देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत श्रीनगर (हनुमान नगर) परिसरात सांडपाण्याची गंभीर समस्या अनेक दिवसांपासून कायम असून, ग्रामपंचायतीच्या प्रशासकांच्या मनमानी व उदासीन कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. येथील सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या समस्येबाबत हनुमान नगर परिसरातील नागरिकांनी देवमाळी ग्रामपंचायतीच्या प्रशासकांना प्रत्यक्ष भेटून पक्की नाली बांधण्याची मागणी केली. तसेच यासंदर्भात लेखी निवेदन देत, प्रशासकांनी प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करून सांडपाणी योग्य प्रकारे वाहून नेण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी विनंतीही करण्यात आली होती. मात्र, प्रशासकांनी केवळ कच्ची नाली खोदून तात्पुरती उपाययोजना केल्याने समस्या सुटण्याऐवजी अधिक गंभीर झाली आहे.
सदर खोदकाम सिमेंट रस्त्यालगत करण्यात आल्याने रस्ता खचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी यावर आक्षेप घेत सिमेंटची पक्की नाली बांधण्यात यावी, अशी ठाम मागणी केली असतानाही प्रशासक हेतूपुरस्पर टाळाटाळ करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
विशेष म्हणजे, या कामाचे अंदाजपत्रक आधीच तयार असून संबंधित शाखा अभियंत्यांनी सदर काम तात्काळ मार्गी लावण्याची शिफारसही केलेली आहे. तरीसुद्धा प्रशासकांकडून कामात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचे चित्र आहे. परिणामी सांडपाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालला असून दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव व आजारांचा धोका वाढत आहे.
प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. “तात्काळ पक्की नाली बांधून सांडपाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे. प्रशासकांनी त्वरित निर्णय घेऊन काम मार्गी लावावे, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.