राजापूर जकात नाका ते शासकीय विश्रामगृह मार्गावरील जीवघेणा खड्डा; अपघाताचा धोका वाढला
[ रत्नागिरी | १५ जानेवारी २०२६ ]
✍️ अनिकेत मेस्त्री
➡️ राजापूर शहरातील जकात नाका ते शासकीय विश्रामगृह राजापूर या जुन्या मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून जकात नाक्यावरून खाली उतरताना मोरीवर मधोमध पडलेला मोठा खड्डा वाहनचालकां साठी जीवघेणा ठरत आहे.
मुंबई गोवा महामार्ग नवीन झाल्यानंतर हा जुना महामार्ग सध्या सर्व्हिस रोड म्हणून वापरात असून शहरातील वाहतूक तसेच स्थानिक नागरिकांसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे.मात्र या मार्गावरील खड्ड्याकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जकात नाक्यावरून उतरत असताना मोरीच्या ठिकाणी पडलेला हा खड्डा थेट रस्त्याच्या मध्यभागी आहे.रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे हा खड्डा वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नाही.त्यामुळे दुचाकीस्वार रिक्षाचालक तसेच चारचाकी वाहनधारकांना अचानक ब्रेक मारावा लागतो किंवा वाहन खड्ड्यात आदळून अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
विशेषतःमोटारसायकल आणि रिक्षा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते तसेच वाहनचालकां च्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
विशेष बाब म्हणजे सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूर यांचे कार्यालय या ठिकाणापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर आहे.या मार्गावरून संबंधित खात्याचे अधिकारी व कर्मचारी नियमितपणे ये-जा करतात.असे असतानाही या धोकादायक खड्ड्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.अनेकदा स्थानिक नागरिकांनी तोंडी तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.
हा रस्ता शासकीय विश्रामगृह प्रशासकीय कार्यालये तसेच शहरातील विविध भागांना जोडणारा असल्याने या मार्गावर वाहतुकीची सतत वर्दळ असते.
शासकीय अधिकारी कर्मचारी पर्यटक तसेच स्थानिक नागरिक याच मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात त्यामुळे येथे अपघात झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांच्या मते हा खड्डा तातडीने बुजवून योग्य दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे.अन्य था एखादा मोठा अपघात घडल्या शिवाय प्रशासन जागे होणार नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे.तातडीची उपाय योजना करून रस्ता सुरक्षित करावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन आवश्यक दुरुस्ती कामे करावीत अन्यथा भविष्यात अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
➖➖➖➖➖➖