logo

राजापूर–शिळ–सौंदळ रेल्वे स्टेशन रस्ता रुंदीकरण व उंचीकरणाची मागणी

➡️अरविंद लांजेकर यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

➡️राजापूर तालुक्यातील प्र.जि.मा. ६८ क्रमांकाच्या राजापूर शिळ गोठणे दोनिवडे चिखलगाव सौंदळ रेल्वे स्टेशन पाचल या प्रमुख मार्गाच्या रुंदीकरण,उंचीकरण व मजबुती करणाची तातडीची गरज असल्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत कोंडये येथील श्री. अरविंद अशोक लांजेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, राजापूर येथील उपअभियंत्यांना सविस्तर निवेदन दिले आहे.

हा मार्ग राजापूर शहरासह संपूर्ण पंचक्रोशीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. सौंदळ रेल्वे स्टेशन हे राजापूर व परिसरातील नागरिकांसाठी जवळचे रेल्वे स्टेशन असल्याने मुंबई, रत्नागिरी, गोवा तसेच कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची सतत वर्दळ या मार्गावर असते. त्यामुळे रस्त्याची सध्याची अवस्था अपुरी ठरत असून अपघात व वाहतूक कोंडीचा धोका वाढला आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, हा रस्ता अर्जुन नदीच्या काठाने जात असल्याने पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून मार्ग पूर्णपणे बंद होतो. राजापूर मोठ्या पुलाजवळील पावसकरवाडी, शिळ येथील गांगो मंदिर पुलाजवळ, गोठणे दोनिवडे येथील साखरकर व खलिफे घराजवळ, चिखलगाव बादयाचा माळ तसेच पाजवे वाडी परिसरातील सखल भागात पूरपाणी आल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. या काळात ये-जा करणे अत्यंत कठीण होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

या पार्श्वभूमीवर संबंधित रस्त्याचे रुंदीकरण, उंचीकरण व मजबुतीकरण तात्काळ करण्यात यावे, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, रत्नागिरी तसेच आमदार किरण सामंत यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

1
1047 views