logo

लोकप्रतिनिधीची चक्क चोरी! भाजप नगरसेवकाने सार्वजनिक शौचालयाचे वीज-पाणी चोरी केले

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात स्वच्छता राखण्याचे आवाहन सातत्याने केले जात असताना, देवळी शहरात लोकप्रतिनिधीच सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. देवळी नगर परिषदेचे भाजप नगरसेवक तथा माजी शिक्षण सभापती बंडू उर्फ विलास जोशी यांनी सार्वजनिक सुलभ शौचालयासाठी असलेल्या पाणी व वीजपुरवठ्याची गेल्या अनेक वर्षांपासून अवैधरित्या चोरी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
देवळी शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील काळा पूल परिसरात नगर परिषदेच्या वतीने सार्वजनिक सुलभ शौचालय उभारण्यात आले आहे. या शौचालयाची नियमित स्वच्छता व पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी नगर परिषदेने स्वतंत्र बोअरवेल व स्वतंत्र वीज जोडणीची व्यवस्था केलेली आहे. मात्र, संबंधित नगरसेवक विलास उर्फ बंडू जोशी यांनी या सार्वजनिक बोअरवेलमधून सुमारे ५० मीटर लांबीची पाइपलाइन थेट आपल्या खासगी निवासस्थानी टाकून पाण्याचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे.
विशेष म्हणजे, या बोअरवेलसाठी लागणारे वीज बिल देवळी नगर परिषद भरत होती, तर त्या वीज व पाण्याचा वैयक्तिक वापर नगरसेवक स्वतःच्या घरासाठी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक सुलभ शौचालयाचा पाणीपुरवठा पूर्णतः खंडित झाला होता. परिणामी, शौचालयाची नियमित स्वच्छता न झाल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. याचा थेट त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत होता.
या गंभीर प्रकाराबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर अखेर नगर परिषद प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली. देवळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नेहा आकोडे यांनी कर्मचाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी व चौकशी केली. यावेळी सार्वजनिक बोअरवेलमधून नगरसेवकाच्या घराकडे गेलेली सुमारे ५० मीटर लांबीची पाइपलाइन व अवैध जोडणी स्पष्टपणे आढळून आली.
सरकारी मालमत्तेची चोरी, सार्वजनिक सुविधांचा गैरवापर तसेच लोकप्रतिनिधी पदाचा गैरफायदा घेतल्याप्रकरणी संबंधित नगरसेवकावर कठोर कायदेशीर कारवाई करून तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी देवळीतील नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणात नगर परिषद प्रशासन व मुख्याधिकारी पुढे कोणती ठोस पावले उचलतात, याकडे आता संपूर्ण देवळी शहराचे लक्ष लागले आहे.

8
530 views