
महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर 15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी
जाहीर,
मतदानाच्या दिवशी रजा नाकारणाऱ्या आस्थापनांवर होणार कारवाई
नांदेड, दि.12 - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या
निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून, या दिवशी नांदेड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर
करण्यात आली आहे. याबाबतचे अध्यादेश महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग तसेच उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने निर्गमित केले आहेत.
हा निर्णय प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी पालिका प्रशासन दक्ष राहणार असुन मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी किंवा आवश्यक सवलत न दिल्यास संबंधित आस्थापनांवर दुकाने व आस्थापना खात्यामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
कोणत्या आस्थापनांना सुट्टी लागू?
पालिका क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाची शासकीय व निमशासकीय कार्यालये,
सार्वजनिक उपक्रम, बँका यांना ही सार्वजनिक सुटी लागू राहणार आहे. तसेच, पालिका निवडणूक क्षेत्रातील मतदार शहराबाहेर कार्यरत असले तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी मिळणार, असे अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने जारी केलेल्या स्वतंत्र
आदेशानुसार सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खासगी कंपन्या, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार व औद्योगिक उपक्रम, आयटी कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स आणि रिटेलर्स यांनाही मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देणे बंधनकारक असणार आहे.
सुट्टी शक्य नसल्यास विशेष सवलत
दरम्यान, ज्या आस्थापनांना सुट्टी दिल्यास नुकसान होऊ शकते अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत असऱ्यांसाठी नियमात शिथिलता देण्यात आली आहे. अशा
आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी न देता मतदानासाठी 2 ते 3 तासांची विशेष सवलत देणे बंधनकारक आहे. मात्र, यासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी असणे आवश्यक आहे.
सुट्टी न दिल्यास साधा संपर्क
पालिकेच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांनी मतदानाच्या दिवशी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास नागरिकांनी कंट्रोल रुम क्रमांक - 02462- 230720 व 230721
यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन पालिकाआयुक्त तथा निवडणूक अधिकारी महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.