logo

जिल्हा रुग्णालयातील संवेदनशून्यता उघडी रिकामी सलाईन, टोचलेली सुई आणि अखेर मरणयातना

जिल्हा रुग्णालय म्हणजे गरिबांचा आधार. मात्र बीड जिल्हा रुग्णालयातील एका घटनेने या आधारालाच तडे गेल्याचे चित्र समोर आले आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या एका वृद्ध रुग्णाला वेळेवर आवश्यक उपचार न मिळाल्याने तासन्‌तास वेदनेत तडफडत अखेर जीव गमवावा लागला.
निरगुडी येथील अंदाजे ६५ ते ७० वर्षे वयाचे हे वृद्ध अविवाहित होते. मुलं-बाळं नसल्याने ते एकटेच जीवन जगत होते. काही दिवसांपूर्वी प्रकृती गंभीर बिघडल्याने नातेवाईकांनी त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णाजवळ बसणार कोण, हा प्रश्न येथे उपस्थित झाला. कामधंद्यामुळे नातेवाईक रुग्णालयात थांबू शकले नाहीत आणि वृद्ध रुग्ण एकटाच उपचार घेत राहिला.
जिल्हा रुग्णालयातील कक्ष क्रमांक ४६ मध्ये हे वृद्ध बेशुद्ध अवस्थेत होते. नातेवाईक नसल्याने त्यांना जमिनीवर गादी टाकून उपचार सुरू होते. अशा स्थितीत रुग्णाला खाली ठेवणे सुरक्षित मानले जाते. मात्र येथे सुरक्षेपेक्षा निष्काळजीपणाच जास्त दिसून आला. रुग्णाच्या हाताला सलाईनची सुई टोचलेली होती, पण सलाईनच्या बाटलीत औषधाचा एक थेंबही नव्हता. तरीही ती रिकामी बाटली तासन्‌तास रुग्णाच्या हाताला लावून ठेवण्यात आली होती.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, रुग्ण काही क्षण शुद्धीवर येऊन “आय विल सी” असे शब्द उच्चारत होता. मात्र त्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. उपचाराच्या नावाखाली सुरू असलेली ही उदासीनता अखेर त्या वृद्धाच्या मृत्यूत संपली.
शनिवारी सायंकाळी त्या वृद्धाची प्राणज्योत मावळली. वय झाले होते म्हणून दुर्लक्ष योग्य ठरते का? की निष्काळजीपणालाच जबाबदार धरले जाणार? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.
या प्रकरणामुळे जिल्हा रुग्णालयातील गरीब व निराधार रुग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

7
840 views