logo

निळावंती चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर; महाराष्ट्रभर उत्सुकता शिगेला

बहुचर्चित, गूढ आणि आजवर पूर्णपणे न उलगडलेला रहस्यमय विषय असलेली निळावंती आता रुपेरी पडद्यावर साकार होत असून अश्वयुग फिल्म प्रोडक्शन निर्मित निळावंती एक रहस्य हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लोककथांमधील गूढता,भीती आणि कुतूहल यांमुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या राज्यात निवडणुकांचे वातावरण आणि शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक लक्षात घेता, परिस्थिती शांत झाल्यानंतरच चित्रपटाची अधिकृत प्रदर्शन तारीख जाहीर केली जाणार असल्याची माहिती निर्मिती टीमकडून देण्यात आली आहे. योग्य वेळ आणि प्रेक्षकांची उपलब्धता पाहूनच चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू असून महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही विविध माध्यमांतून प्रचार करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही निळावंती एक रहस्य या चित्रपटाबाबत मोठी चर्चा रंगताना दिसत आहे. निळावंती सारख्या रहस्यमय विषयावर आधारित चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालेल, असा विश्वास चित्रपट रसिक व्यक्त करत आहेत. चित्रपटाचे सह-निर्माते पंडित (राजवीर) विठ्ठल राठोड यांनी सांगितले की, निळावंती हा विषय केवळ कथा नसून लोक कथांमधील गूढता, भय आणि सत्य-असत्याच्या सीमारेषेचा शोध घेणारा आहे. प्रेक्षकांना वेगळा आणि धरारक अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे, ऑटोम `शन व रोबोटिक्स क्षेत्रातील नामांकित कंपनीत असिस्टंट मॅनेजर (इंजिनियर) म्हणून कार्यरत असलेले राठोड यांनी चित्रपट क्षेत्रात सह-निर्माता म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटात नामांकित गायकांची गाणी, प्रभावी पार्श्वसंगीत तसेच अनुभवी आणि लोकप्रिय कलाकारांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. रहस्य, थरार आणि भावनांचा समतोल साधत चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल, असा विश्वास निर्मिती टीमने व्यक्त केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन भाऊसाहेब इरोळे यांनी केले असून त्यांच्या प्रभावी दिग्दर्शनशैलीमुळे कथेला अधिक गहिरेपणा मिळाल्याचे बोलले जात आहे. एकूणच, निळावंती एक रहस्य हा चित्रपट केवळ मनोरंजन न करता प्रेक्षकांना विचार करायला लावणारा अनुभव देणारा ठरणार असून त्याच्या प्रदर्शनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

20
1318 views