logo

मेहनत, मार्गदर्शन आणि मोफत संधीचा आदर्श संगम, विजयसिंह पवार सरांच्या नेतृत्वाखाली पोलीस भरती तयारीचा यशस्वी उपक्रम

मेहनत, मार्गदर्शन आणि मोफत संधीचा आदर्श संगम,


विजयसिंह पवार सरांच्या नेतृत्वाखाली पोलीस भरती तयारीचा यशस्वी उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र, अमळनेर, पातोंडा परिसर विकास मंच आणि राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस भरतीसाठी मोफत टेस्ट सिरीज दर रविवारी नियमितपणे आयोजित करण्यात येत असून या उपक्रमाला अमळनेर तालुक्यासह परिसरातील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका, वेळेचे नियोजन, उत्तर लेखन कौशल्य आणि आत्मपरीक्षणाची संधी मिळत आहे. केंद्राचे संचालक विजयसिंह पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शकही वेळोवेळी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करत असतात.
विजयसिंह पवार सर विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेत असून, विविध स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज सोडवून घेणे, त्यांचे मूल्यमापन करणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणे अशी सर्व जबाबदारी ते अत्यंत निष्ठेने पार पाडतात. या उपक्रमांच्या वेळी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच प्रशासकीय अधिकारीही आवर्जून उपस्थित राहतात.
या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आज विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. हे यश म्हणजे पवार सर यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांचे व विद्यार्थ्यांप्रती असलेल्या तळमळीचे फलित आहे. शिरसाळे माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले विजयसिंह पवार सर आपली शैक्षणिक जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडून, आठवड्यातील प्रत्येक रविवार विद्यार्थ्यांसाठी समर्पित करतात, ही बाब अमळनेर तालुक्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.
आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकजण स्वतःच्या वेळेचा हिशोब ठेवत असताना, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी स्वतःचा वेळ, ऊर्जा आणि अनुभव देणारा हा “देवमाणूस” अमळनेर तालुक्याचे भूषण ठरत आहे. त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून त्यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित होऊन नामवंत संस्थांमध्ये कार्यरत आहेत. या प्रवासात पवार सर यांच्या पत्नींचे खंबीर पाठबळ नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे.
जीवनात अनेक संकटांचा सामना करूनही न डगमगता, मितभाषी स्वभाव, सहकार्याची भावना आणि “कधीच नाही न म्हणणारी” मार्गदर्शक वृत्ती हे पवार सर यांचे खास वैशिष्ट्य आहे. पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या या स्पर्धा परीक्षा केंद्राला वाचनालयाचे अध्यक्ष व संचालक मंडळ, माजी अध्यक्ष-संचालक, प्रशासनातील अधिकारी, शिरसाळे संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच मित्रपरिवार यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभत आहे.
दर रविवारी टाऊन हॉल समोरील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर येथे चालणाऱ्या या स्पर्धा परीक्षा केंद्रातील टेस्ट सिरीजमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्पर्धात्मक तयारी आणि यशाची जिद्द निश्चितच वाढताना दिसत आहे. ही चळवळ केवळ परीक्षा तयारीपुरती मर्यादित न राहता, राष्ट्रघडणीसाठी सक्षम तरुण घडवणारी प्रेरणादायी चळवळ ठरत आहे.


1
66 views