
गडचिरोलीतून 100 कोटींच्या निर्यातीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा
*महानिर्यात-इग्नाईट कन्व्हेन्शन 2026 एक दिवसीय परिषद संपन्न*
गडचिरोली, (जिमाका) दि. 10 :
“गडचिरोली जिल्हा आज प्रगतीपथावर असून निर्यातीच्या बाबतीत मोठी क्षमता निर्माण झाली आहे. मात्र, जेवढी क्षमता आहे तेवढी निर्यात अद्याप साध्य करता आलेली नाही. सध्या जिल्ह्याची निर्यात 4 कोटींवरून 32 कोटींवर पोहोचली आहे, ही निश्चितच समाधानकारक बाब आहे. येत्या काळात ही निर्यात 100 कोटींच्या पुढे नेण्यासाठी उद्योजकांनी नियोजनबद्ध पद्धतीने पुढाकार घ्यावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा यांनी केले.
जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित “महानिर्यात-इग्नाईट कन्व्हेन्शन 2026” च्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. राज्यातील नवउद्योजक, एमएसएमई व निर्यातक्षम उद्योगांना चालना देण्याच्या उद्देशाने उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली यांच्या वतीने या एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी श्री. पंडा पुढे म्हणाले की, निर्यात वाढीसाठी क्लस्टर विकास, पीएमसीएमआय योजनेअंतर्गत ब्रँडिंग व पॅकेजिंगला विशेष महत्त्व आहे. नाशिक व नागपूर जिल्ह्यांनी ब्रँडिंग व पॅकेजिंगच्या माध्यमातून निर्यात कशी वाढविली याचा अभ्यास करून गडचिरोलीतील उद्योजकांनीही त्याचा लाभ घ्यावा. जिल्ह्यात तांदूळ, वनउपज, चारोळी, मोहा आदी उत्पादनांवर आधारित आजीविका क्लस्टर तयार झाले असून, या सर्व उत्पादनांना एकत्रितपणे बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक सामायिक पोर्टल उभारण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्यामुळे दुर्गम तालुक्यांतील उत्पादकांनाही माहिती मिळून ते निर्यात प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील.
“लघुउद्योजकांना उद्योगासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन नेहमीच प्रयत्नशील आहे. रिक्त व कमी वापरातील औद्योगिक भूखंड लघुउद्योजकांसाठी विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठी संधी आहे; उद्योजकांनी पुढाकार घेतला आणि नवे प्रयोग साकारले तर यश निश्चित आहे,” असेही त्यांनी नमूद केले. शेवटी सर्व उद्योजकांना गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
उद्योग सहसंचालक शिवकुमार मुद्दमवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील निर्यात कशी वाढविता येईल याबाबत मार्गदर्शन करत उद्योग विभागाच्या निर्यात धोरणाची माहिती दिली. “एक तालुका – दहा निर्यातदार” हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. बांबू धोरण, लॉजिस्टिक धोरण, औद्योगिक धोरण तसेच ‘मैत्री कायदा’ अंतर्गत उपलब्ध 146 सेवा व 14 विभागांच्या परवानग्यांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
कार्यशाळेत जिल्ह्यातील 150 हून अधिक उद्योजक, नवउद्योजक व शेतकरी गटांनी सहभाग नोंदविला. मैत्री कक्षामार्फत श्री. विजय शिंदे व श्रीमती युगा देवधर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मैत्री कायदा 2023 व उद्योग सुलभीकरणासाठी शासनाने उचललेल्या पावलांची माहिती दिली. डीजीएफटी, नागपूरचे प्रतिनिधी श्री. प्रतीक गजभिये यांनी निर्यात प्रक्रिया व आर्थिक सहाय्य योजनांवर मार्गदर्शन केले. इंडिया पोस्टचे श्री. श्रीहरी कुंभार यांनी डाक निर्यात केंद्राची माहिती दिली, तर न्यू इंडिया अॅश्युरन्सचे श्री. मयूर कावरे यांनी एमएसएमई विमा योजनांबाबत मार्गदर्शन केले. महास्ट्राईडचे उद्योग तज्ज्ञ श्री. रंजन पांढरे यांनी स्टील व धातूआधारित उपपुरक उद्योगांच्या संधी स्पष्ट केल्या. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री. भास्कर मेश्राम यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनमोल कोरे यांनी केले. त्यांनी उद्योग विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. शेवटी उद्योग सहसंचालक, नागपूर विभाग यांच्या वतीने आभार मानून कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.