logo

अजब गावची गजब कहाणी : जळकोट तालुक्यातील घोणसी गावात निकृष्ट पाईप व चुकीच्या कामामुळे पाणीपुरवठा योजनेचा फज्जा

अजब गावची गजब कहाणी : जळकोट तालुक्यातील घोणसी गावात निकृष्ट पाईप व चुकीच्या कामामुळे पाणीपुरवठा योजनेचा फज्जा
जळकोट तालुक्यातील घोणसी गावात काही वर्षांपूर्वी पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली होती. मात्र या योजनेत अत्यंत निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात आल्याने आज ही योजना गावकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. पाईपलाईन वारंवार फुटत असून, त्या फुटलेल्या जागी उपाययोजना करण्याऐवजी चक्क एक गाडी ढकल्या बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, पाईप फुटलेल्या ठिकाणी दुरुस्ती किंवा मजबूत पाईप बसवणे अपेक्षित असताना, त्या जागेवर गाडी ढकल्या बसवून विषय झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या ढकल्यामुळे त्या ठिकाणी पाईपलाईनवर अधिक दाब येत असून, खराब दर्जाचे पाईप हा दाब सहन करू शकत नसल्याने इतर ठिकाणीही रोज चारपेक्षा जास्त फुटी होत आहेत.
या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. एकीकडे गावात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना, दुसरीकडे पाणी रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. रस्त्यावर पाणी साचून चिखल, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छता वाढली आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा गंभीर परिणाम होत आहे.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, संपूर्ण पाणीपुरवठा योजनेत निकृष्ट साहित्याचा वापर करून ठेकेदाराने काम केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी व गुणवत्ता तपासणी न केल्यामुळेच अशी अवस्था निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. फुटलेल्या पाईपवर गाडी ढकल्या बसवणे हा तात्पुरता आणि धोकादायक उपाय असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या प्रकरणामुळे घोणसी गावात तीव्र संताप व्यक्त होत असून, पाणीपुरवठा विभाग, ठेकेदार आणि ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संपूर्ण पाईपलाईन बदलून दर्जेदार पाईप बसवावेत, चुकीच्या ठिकाणी बसवलेली गाडी ढकल्या तात्काळ हटवावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पाणीटंचाईच्या काळात निकृष्ट काम, फुटणारी पाईपलाईन आणि वाया जाणारे पाणी, हीच सध्या जळकोट तालुक्यातील घोणसी गावाची अजब गावची गजब कहाणी ठरत आहे. प्रशासन यावर केव्हा ठोस कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

15
1719 views