logo

तणावमुक्त मनाने अपघात टाळा!- पिंपरी-चिंचवडच्या 'आय.डी.टी.आर.' संस्थेत सनातन संस्थेचे ८० चालकांना मार्गदर्शन

पिंपरी-चिंचवड येथील प्रसिद्ध 'इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च' (IDTR) संस्थेत सनातन संस्थेच्या वतीने प्रशिक्षणार्थींना 'तणावमुक्त मनस्थितीचे महत्त्व आणि उपाय' या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. वाहन चालवणे ही केवळ शारीरिक कृती नसून, मानसिक एकाग्रतेची प्रक्रिया आहे. रुग्णवाहिका किंवा अवजड वाहने चालवताना शांत मन अपघात रोखण्यासाठी आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या प्राचार्य श्रीमती हेमलता खेडकर यांनी या प्रसंगी उपस्थित ८० प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यात रुग्णवाहिका चालक, अवजड वाहन चालक आणि कॅब चालक महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश होता.

मनावरील ताणामागे शारीरिक आणि मानसिक अशी दोन्ही कारणे असतात, असे स्पष्ट करत श्रीमती खेडकर यांनी यावर मात करण्यासाठी प्रभावी त्रिसूत्री मांडली. यामध्ये नामजप हा ध्यानधारणेचा सोपा प्रकार असून तो चित्त स्थिर करतो; प्राणायाम श्वसनाद्वारे मेंदूला प्राणवायू पुरवून मन शांत ठेवतो, तर स्वयंसूचनांमुळे चुकीच्या प्रतिक्रिया रोखल्या जाऊन व्यक्तिमत्त्व विकास होतो. या त्रिसूत्रीच्या नियमित वापरामुळे मन चिंताविरहित आणि प्रसन्न राहण्यास मदत होते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

'सनातन संस्थे’चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते. या अंतर्गत येथील पिंपरी चिंचवड येथील प्रसिद्ध 'इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च' (IDTR) संस्थेत सनातन संस्थेच्या वतीने 'तणावमुक्त मनस्थितीचे महत्त्व आणि उपाय' या विषयावर मार्गदर्शना उपक्रम राबवण्यात आला.

या मार्गदर्शनादरम्यान प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे निरसन करताना प्राचार्य श्रीमती हेमलता खेडकर यांनी प्रायोगिक उदाहरणे दिली. कोल्हापूरचे प्रशिक्षणार्थी श्री. दत्तात्रय सुतार यांनी प्रशिक्षकाच्या दडपणाखाली हँड ब्रेक काढण्यास विसरण्यासारख्या होणाऱ्या चुका मांडल्या, त्यावर स्वयंसूचनेद्वारे आत्मविश्वास कसा वाढवायचा याचे मार्गदर्शन करण्यात आले. तर, डॉ. सिमरन केसवानी यांनी कामाच्या व्यापात थोडा वेळ डोळे मिटून मानसिक विश्रांती घेण्याच्या प्रयोगाचा सकारात्मक अनुभव कथन केला. इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्चचे संचालक श्री. संजय ससाणे आणि प्रशिक्षक श्री. दिनेश मंडोरे यांच्या सहकार्यामुळे संपन्न झालेल्या या उपक्रमात, नियमित प्रशिक्षणासोबतच मानसिक ताण निर्मूलनाचा विषय शिकायला मिळाल्याबद्दल सर्व प्रशिक्षणार्थींनी समाधान व्यक्त केले.

2
526 views