logo

रिसोड येथे स्वर्गीय शिक्षण महर्षि ॲड.आप्पासाहेब सरनाईक स्मृती दिनानिमित्त विविध खेळाच्या सप्ताहाचे आयोजन

रिसोड(प्रतिनिधी) :- महेंद्र कुमार महाजन

खेळामध्ये हार जीतला महत्त्व नसून सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो, खेळातील सहभागाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते असे प्रतिपादन अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ॲड.किरणराव सरनाईक यांनी स्थानिक श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे स्वर्गीय शिक्षण महर्षि ॲड.आप्पासाहेब सरनाईक स्मृती सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत असताना केले.
11 जानेवारी रोजी आप्पासाहेब सरनाईक यांचा स्मृतिदिन असतो त्यानिमित्ताने श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशीम अंतर्गत येत असलेल्या सर्वच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दरवर्षी स्मृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्यानिमित्ताने आयोजित स्मृती सप्ताहाच्या उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आमदार ॲड.किरणराव सरनाईक हे उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम शिक्षण महर्षि स्वर्गीय ॲड.आप्पासाहेब सरनाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने शिक्षक आमदार
ॲड.किरणराव सरनाईक यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पुढे बोलताना आमदार सरनाईक म्हणाले की शालेय जीवनामध्ये शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारच्या सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन होणे अनिवार्य असते. आप्पासाहेब सरनाईक स्मृती सप्ताहाच्या निमित्ताने श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी प्राचार्य संजय देशमुख यांचे कौतुक केले व त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणतीही इजा होणार नाही याची विशेष काळजी घेण्याचेही सूचित केले. या सप्ताहाच्या निमित्ताने निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, खो-खो, कबड्डी, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा व डान्स स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे संचालन दिगंबर पाचारणे यांनी केले तर आभार क्रीडा शिक्षक विनोद बावणे यांनी मांडले.

12
3030 views