logo

पिंपळे गुरवमधील सोसायट्यांचा राष्ट्रवादीवर विश्वास चारही उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांचा प्रतिसाद

पिंपळे गुरवमधील सोसायट्यांचा राष्ट्रवादीवर विश्वास
चारही उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांचा प्रतिसाद
पिंपळे गुरव | प्रतिनिधी उमेश पाटील 8530664576
पिंपळे गुरव परिसरातील विविध सोसायट्या व निवासी संकुलांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांचा प्रचार वेग घेत असून, नागरिकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मध्यमवर्गीय तसेच उच्चभ्रू रहिवाशांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीबाबत विश्वास व्यक्त केला जात आहे.
चारही उमेदवार उच्चशिक्षित असून, ते परिसरातील विविध समाजघटकांशी थेट संवाद साधत आहेत. प्रचारादरम्यान नागरिकांच्या अडचणी, अपेक्षा व प्रश्न जाणून घेण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र दिसून आले.
गेल्या तीन दशकांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांमुळे पिंपळे गुरव परिसरात वास्तव्यास येण्याचा निर्णय घेतल्याचे अनेक रहिवाशांनी सांगितले. रस्ते, मूलभूत सुविधा व नियोजनबद्ध विकासामुळे हा परिसर राहण्यासाठी योग्य ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
मात्र, मागील दोन पंचवार्षिक महापालिका कालावधीत सत्ताधारी आणि प्रशासनाकडून सोसायट्यांकडे दुर्लक्ष झाल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. अपुरा पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, रस्त्यांवरील पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी, तसेच ड्रेनेजमधून सांडपाणी वाहण्याच्या समस्या सातत्याने भेडसावत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
निवडणुकांच्या काळातच लोकप्रतिनिधी परिसरात दिसतात, अशी तक्रारही काही नागरिकांनी मांडली. मागील आठ वर्षांत माजी लोकप्रतिनिधी परिसरात आले नसल्याचे मत रहिवाशांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीच्या प्रशासनकाळात या भागात वास्तव्यास आलेल्या नागरिकांनी, मागील अनुभवांच्या आधारे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे.
विरोधी पक्ष भाजपचे उमेदवार एकाच भागातील असल्याने समस्या मांडण्यासाठी योग्य संपर्क कोणता, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचेही काही ठिकाणी जाणवले. त्याउलट राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार प्रभागातील वेगवेगळ्या भागांचे प्रतिनिधित्व करीत असल्याने नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
आगामी मतदान प्रक्रियेत पिंपळे गुरव परिसरातील मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

11
410 views