logo

निवडणुकीच्या रणधुमाळीत वाढता राजकीय हिंसाचार; मुंबई, सोलापूरसह छत्रपती संभाजीनगरमध्ये तणाव

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विविध भागांत राजकीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. उमेदवार, पदाधिकारी आणि नेत्यांवर हल्ल्याच्या घटना समोर येत असून, मुंबई, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर तसेच अकोट या शहरांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमचे नेते व खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. एका उमेदवाराच्या प्रचारासाठी ते बायजीपुरा भागात आले असता एमआयएममधीलच नाराज तसेच विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत जोरदार विरोध केला. याच गटाने त्यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या हल्ल्यामागे राज्याचे मंत्री अतुल सावे आणि संजय शिरसाट यांचा हात असल्याचा थेट आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्हीही रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, जलील यांनी या घटनेचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कलिम कुरेशी यांच्या कार्यकर्त्यांवर केला आहे. मात्र कुरेशी यांनी हे आरोप फेटाळून लावत एमआयएममध्येच तिकीट वाटपावरून तीव्र नाराजी असून, पक्षाची अंतर्गत स्थिती ढासळलेली असल्याने हा प्रकार त्यांनीच घडवून आणल्याचा दावा केला आहे.
महापालिका निवडणुकीदरम्यान एमआयएमने यापूर्वी निवडून आलेल्या २६ नगरसेवकांपैकी तब्बल २२ नगरसेवकांची उमेदवारी कापली होती. हा निर्णय इम्तियाज जलील यांनी घेतल्याचा आरोप माजी नगरसेवकांकडून करण्यात येत असून, याच नाराजीतून हा वाद उफाळून आल्याचे बोलले जात आहे.
राजकीय हिंसाचाराच्या घटना केवळ छत्रपती संभाजीनगरपुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत. मुंबईत शिवसेनेचे उमेदवार हाजी कुरेशी यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. मालाड परिसरातही एका अपक्ष उमेदवारावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे, त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरणही अस्थिर झाले आहे.
सोलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी मनसेच्या एका पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याने शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, अकोट येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत उल्लाखाँ बरकतउल्लाखाँ पटेल यांचे बुधवारी ता. ७ रोजी उपचारादरम्यान निधन झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला होता. त्यांच्या निधनाची बातमी समजताच समर्थकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. संतप्त समर्थकांनी अकोट पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती काहीशी निवळली. सायंकाळी त्यांच्या मूळ गावी मोहाळा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राज्यातील विविध भागांत घडणाऱ्या या घटनांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी काळात प्रशासन व पोलिस यंत्रणेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

18
36 views