logo

महाराष्ट्र राज्यात विक्रमी 66 नगरसेवक बिनविरोध; निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश

राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये यंदा बिनविरोध निवडून येणाऱ्या नगरसेवकांचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. तब्बल 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून, हा आकडा आजवरचा सर्वांत मोठा मानला जात आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
भाजपने या बिनविरोध निवडींमध्ये आघाडी घेतली असून, कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचे सर्वाधिक 14 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. या यशाचे श्रेय प्रामुख्याने डोंबिवलीचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिले जात आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरात शिंदेसेनेचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पनवेल महापालिकेतही भाजपला मोठे यश मिळाले असून, येथे 7 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पनवेलमधून भाजपचे नितीन पाटील हे सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवकपदी निवडून आले.
इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या बिनविरोध निवडींमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवले आहेत. बिनविरोध निवड करताना कोणताही दबाव, धमकी किंवा आमिष दाखवण्यात आले होते का, याचा तपास केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या चौकशी अहवालानंतरच पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार असून, या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे

6
251 views