logo

खानदेश शिक्षण मंडळ निवडणुकीत सौ. वसुंधरा लांडगे यांची चौथ्यांदा दणदणीत विजयाची घोडदौड; मान्यवरांकडून गौरवपूर्ण सत्कार


खानदेश शिक्षण मंडळ निवडणुकीत सौ. वसुंधरा लांडगे यांची चौथ्यांदा दणदणीत विजयाची घोडदौड; मान्यवरांकडून गौरवपूर्ण सत्कार

अमळनेर प्रतिनिधी :
खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेरची त्रैवार्षिक निवडणूक दिनांक ४ जानेवारी २०२६, रविवार रोजी शांततेत व उत्साहात पार पडली. या निवडणुकीत सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असतानाच, सौ. वसुंधरा दशरथ लांडगे यांनी विश्वस्त पदावर भरघोस मतांनी विजय मिळवत आपली सलग चौथी टर्म निश्चित केली. त्यांच्या या विजयी वाटचालीला रोखणे कोणालाही शक्य झाले नाही, अशी भावना समर्थकांनी व्यक्त केली.

या ऐतिहासिक यशानिमित्त आज सौ. लांडगे यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ ग्रेड मुख्याध्यापक श्रीराम नाना पाटील, ग्रेड मुख्याध्यापक हरीचंद्र शिवराम कढरे, मा. माध्यमिक मुख्याध्यापक श्री. व्ही. ए. पाटील, मंगरूळ माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रकाश पाटील, पत्रकार तथा माध्यमिक शिक्षक श्री. ईश्वर महाजन आणि माजी केंद्रप्रमुख श्री. गोकुळ पाटील (पं.स. अमळनेर) हे सर्व मान्यवर सहकुटुंब उपस्थित होते. यावेळी लक्ष्मी–नारायण जोडी म्हणून सौ. वसुंधराताई लांडगे व श्री. दशरथ लांडगे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना आबासाहेब गोकुळ पाटील, आदर्श माजी केंद्रप्रमुख यांनी सौ. लांडगे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “हा विजय त्यांच्या निस्वार्थ सेवाभावी वृत्तीचा, तत्परतेचा आणि सातत्यपूर्ण कार्याचा परिणाम आहे. कोणतेही कार्य नकार न देता स्वीकारून त्या समाजासाठी झटत राहिल्या. विविध क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळेच त्या समाजप्रिय ठरल्या असून प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.”

सौ. लांडगे या केवळ प्रशासकीय कार्यातच नव्हे, तर सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातही तितक्याच प्रभावी आहेत. कोणत्याही कार्यक्रमात त्या निशुल्क सूत्रसंचालन, प्रसंगानुरूप शेरोशायरी, साजेशी गीतांची गुंफण करून कार्यक्रम अधिक रंगतदार करतात. त्यांच्या या गुणांतून कवयित्री मनाचे दर्शन घडते. त्यामुळेच त्यांना प्रेमाने “खानदेशची लता मंगेशकर” असे संबोधले जाते. विनम्रता, सुस्वभाव, सेवाभाव आणि संस्कार हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे केंद्रबिंदू आहेत.

अर्बन बँक, शिक्षक पतसंस्था, साने गुरुजी शिक्षक पतपेढी यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये संचालक म्हणून त्यांनी जबाबदारीने काम करत पदाला न्याय दिला. एक आदर्श शिक्षिका म्हणून साने गुरुजी शाळेत त्यांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. तसेच जिजाऊ वंदना, शिवशाही विवाह योजना अंतर्गत संपूर्ण खानदेशात आतापर्यंत सुमारे १३५० विनामूल्य विवाह घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे.

या यशामागे श्री. दशरथ लांडगे (नाना) यांची भक्कम साथ महत्त्वाची ठरली. “यशस्वी स्त्रीमागे समर्थ पुरुष उभा असतो” हे येथे प्रत्ययास येते. नानांची ही साथ जणू अर्जुनासाठी श्रीकृष्णाने बजावलेल्या सारथीच्या भूमिकेसारखी असल्याचे उदाहरण मान्यवरांनी दिले. ऊन–सावलीसारखी साथ, समंजस मार्गदर्शन आणि अखंड पाठबळ यामुळेच सौ. लांडगे प्रत्येक क्षेत्रात यशाची नवी शिखरे गाठत आहेत.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी सौ. वसुंधरा लांडगे व श्री. दशरथ लांडगे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, “मूर्ती लहान पण कीर्ती महान” या शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

7
377 views
  
1 shares