
*शासकीय कार्यालयीन कामकाजासाठी केवळ शासकीय NIC ई-मेल आयडीचा वापर बंधनकारक – दीपक पाचपुते यांच्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी
*शासकीय कार्यालयीन कामकाजासाठी केवळ शासकीय NIC ई-मेल आयडीचा वापर बंधनकारक – दीपक पाचपुते यांच्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे निर्देश*
अहिल्यानगर | दि. ०१ जानेवारी २०२६ :
मानवाधिकार व संविधानिक हक्क जनजागृती कार्यकर्ते दीपक पाचपुते यांनी शासकीय कार्यालयांमध्ये खाजगी ई-मेल आयडी वापरून होत असलेल्या प्रशासकीय कामकाजाबाबत केलेल्या मागणीच्या अनुषंगाने, जिल्हाधिकारी मा. दादासाहेब रघुनाथ गीते यांनी दिनांक ०१/०१/२०२६ रोजी अधिकृत पत्र निर्गमित करून जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना कार्यालयीन पत्रव्यवहार, आदेश, अहवाल व प्रशासकीय कामकाजासाठी केवळ शासकीय NIC (National Informatics Centre) अधिकृत ई-मेल आयडीच वापरण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.
खाजगी ई-मेल आयडी (Gmail, Yahoo इ.) वापरून शासकीय कामकाज करणे हे डेटा सुरक्षा, गोपनीयता तसेच महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम, 2005 अंतर्गत सार्वजनिक अभिलेख व्यवस्थेचे उल्लंघन ठरते. यामुळे माहिती गळती, अभिलेख नष्ट होणे व आरटीआय अंतर्गत माहिती उपलब्ध न होण्याचा धोका निर्माण होतो.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई, विभागीय चौकशी व सेवा नियमांनुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुख, गटविकास अधिकारी, पंचायत समिती अधिकारी व ग्रामपंचायत स्तरावरील अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे.
दीपक पाचपुते यांनी या निर्णयाचे स्वागत करताना, “शासकीय NIC ई-मेलचा सक्तीने वापर केल्यास प्रशासनात पारदर्शकता, जबाबदारी व नागरिकांचा माहिती अधिकार अधिक मजबूत होईल,” असे मत व्यक्त केले आहे.