
सांगली मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; जादा बसेस असूनही हाल
सांगली – प्रतिनिधी तेजस वाळुंज.
शनिवार व रविवार सुट्ट्या असल्याने पुण्यावरून सांगलीकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. तसेच सोमवारी कामानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांमुळे सांगली मध्यवर्ती बस स्थानकात मोठी गर्दी पाहायला मिळाली.
प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाकडून दोन जादा बसेस सोडण्यात आल्या असल्याची माहिती आगारातील अधिकारी युवराज डोळस यांनी दिली. मात्र सर्व बसेस ऑनलाईन बुकिंगच्या असल्याने अडाणी प्रवासी, ज्येष्ठ नागरिक व स्थानिक प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अनेक प्रवाशांना वेळेवर बस मिळत नव्हती.
सर्व बसेस पूर्णपणे बुकिंग झाल्यामुळे “बाकीचे प्रवासी गावी कसे जाणार?” असा प्रश्न प्रवाशांपुढे उभा राहिला. काल रात्रीच्या घटनेत दोन अतिरिक्त बसेस सोडूनही प्रवाशांची गैरसोय झाली. विशेष म्हणजे सांगली–मिरज आगारामध्ये बुकिंग बसेसमध्ये दोन पत्रकार आरक्षित सीट व दोन दिव्यांग सीटसुद्धा ऑनलाईन बुकिंग केल्याचा प्रकार समोर आला.
पुण्याला जाण्यासाठी बसेस अपुऱ्या असल्याने तसेच सांगली ते पुणे मार्गावरील आष्टा, कराड, सातारा या मधल्या गावांतील प्रवाशांनी कसे प्रवास करायचा, ज्यांचे बुकिंग नव्हते त्यांनी काय करायचे, असे प्रश्न प्रवाशांनी सांगली आगार प्रशासनाकडे मांडले.
यावेळी अधिकारी युवराज डोळस यांनी शक्य तितक्या प्रवाशांना समायोजित करून पाठवण्याचा प्रयत्न केला. लांब पल्ल्याचा प्रवास असल्याने उभ्याने प्रवास केल्यास प्रवाशांचे हाल होतील, याचीही त्यांनी दखल घेतली. प्रवाशांनी त्यांच्या कामाचे कौतुक करत सांगली आगारासाठी मात्र संतप्त भावना व्यक्त केल्या.
शनिवार व रविवारसाठी अजून किमान दोन जादा बसेस सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. तसेच मिरज आगारातून पुण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसेस रस्त्यात बंद पडत असल्याच्या तक्रारीही युवराज डोळस, प्रबंधक यांच्याकडे करण्यात आल्या.
आता येत्या शनिवार-रविवारी प्रशासन प्रवाशांसाठी कोणत्या उपाययोजना करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच सर्व बुकिंग बसेसमध्ये दिव्यांग व पत्रकारांसाठीच्या सीट कायमस्वरूपी आरक्षित ठेवाव्यात, अशी विनंती मी स्वतः पत्रकार म्हणून प्रशासनाकडे केली आहे.