
Chandrapur Corporation Election |भाजपने फोडला प्रचाराचा नारळ, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रोड शोने विदर्भात प्रचाराचा शुभारंभचंद्रपूर : चंद्रपूर महानगर
Chandrapur Corporation Election |भाजपने फोडला प्रचाराचा नारळ, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रोड शोने विदर्भात प्रचाराचा शुभारंभ चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज रविवारी भारतीय जनता पक्षाने मोठ्या शक्तिप्रदर्शनात केला. प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात दाखल झाले आणि महायुतीच्या निवडणूक रथावर उभे राहत शहरात भव्य रोड शो केला.सुमारे तीन किलोमीटरच्या या रोड शो दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी खुल्या निवडणूक रथावर उभे राहत शहरवासीयांकडे मताशीर्वाद मागितले. विशेष म्हणजे, मागील महिनाभर पक्षांतर्गत मतभेदामुळे चर्चेत राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत निवडणूक रथावर उपस्थित होते. दोन्ही नेते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उजव्या-डाव्या बाजूला उभे राहून हात उंचावत अभिवादन करताना दिसल्याने, भाजपमधील अंतर्गत समन्वयाचा संदेश या रोड शोमधून प्रभावीपणे पोहोचला.
रोड शोचा समारोप विजय संकल्प यात्रेच्या समारोपस्थळी, चंद्रपूरच्या ऐतिहासिक जटपुरा गेट येथे करण्यात आला. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फुटल्याने, पक्ष प्रचारात आता अधिक आक्रमकता आणि नियोजनबद्धता दिसून येईल, असे संकेत मिळाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या रोड शोमुळे महायुतीतील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, प्रचाराचा पुढील टप्पा अधिक गतिमान होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.