
अष्टविनायक सिटी सोसायटीकडून गरीब गरजू विद्यार्थ्यांना फॅन वाटप
आळंदी, दि. ४ (वार्ताहर) :
अष्टविनायक सिटी, फुरसुंगी (पुणे) या सोसायटीच्या वतीने श्रीरामकृष्ण अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेला क्रॉम्प्टन कंपनीचे फॅन प्रदान करण्यात आले.
श्रीरामकृष्ण अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था गेल्या पंचवीस वर्षांपासून अनाथ, गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे पालन-पोषण व संगोपन करत असून विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. संस्थेमार्फत संतांच्या पुण्यतिथी व समाधी सोहळ्यांचे आयोजन, पूरग्रस्तांना मदत, विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप तसेच अभिष्टचिंतन कार्यक्रम राबवले जातात.
सदर फॅन वितरण कार्यक्रम अष्टविनायक सिटीचे चेअरमन श्री. बाळासाहेब पाटील, विश्वस्त विनोद देवकाते, दीपक जांभुळकर, ज्ञानेश्वर रासकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी श्री ज्ञानोबारायांचे पुजारी अमोल गांधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मोहन महाराज शिंदे, रामचंद्र सारंग, अशोक सालपे, सचिन शिंदे, प्रथमेश वायकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अष्टविनायक सिटी फुरसुंगी सोसायटीतर्फे वर्षभर विविध सामाजिक व सामुदायिक उपक्रम राबवले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून शिक्षण संस्थेला फॅन देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या वतीने सर्व सभासदांचे आभार मानण्यात आले.