logo

देवरी येथे आज राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आज देवरी येथे करण्यात आले आहे. श्याम महाजन बहुउद्देशीय विकास संस्था, मा. धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट तसेच देवरी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांच्या अध्यक्षतेखाली, खा. नामदेवराव किरसान यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय पुराम, आमदार राजकुमार बडोले, आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार सहसराम कोरोटे, पोलीस अधीक्षक गौरव भामरे, भाजप समन्वयक वीरेंद्र अंजनकर, सभापती अनिल बिसेन, नगराध्यक्ष संजू उईके, धुकेश्वरी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत संगीडवार, उद्योजक शौकी भाटिया, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या राज्यस्तरीय सोहळ्यात कृषिभूषण पुरस्कार, आदर्श शिक्षिका पुरस्कार, शिक्षकरत्न पुरस्कार, दर्पण पत्रकारिता पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, नारीरत्न पुरस्कार, ग्रामभूषण (आदर्श सरपंच) पुरस्कार, सहकार भूषण पुरस्कार, प्रशासकरत्न पुरस्कार, भारतीय संस्कृती रक्षक पुरस्कार तसेच सेवाभाव भूषण पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे.

पुरस्कारार्थींना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा देवरी येथील धुकेश्वरी मंदिर सभागृहात आज सकाळी ११.३० वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक डॉ.घनश्याम निखाडे व समस्त संयुक्त संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

55
3704 views