
आनंद मेळा, मातृसंमेलन आणि सांस्कृतिक रंगत : जनता विद्यालयात ‘उडान’ स्नेहसंमेलनाचे तृतीय पुष्प
पिंपळगाव सराई, बुलढाणा, महाराष्ट्र | दि. ३ जानेवारी २०२६
पिंपळगाव सराई येथील जनता विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या “उडान” या वार्षिक स्नेहसंमेलनाचे तृतीय पुष्प विविध उपक्रमांच्या आणि उत्स्फूर्त सहभागाच्या वातावरणात संपन्न झाले. या दिवशी आनंद मेळा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचा तिसरा टप्पा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे स्थानिक सल्लागार सदाशिव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र खंदारे (पिंपळगाव सराई) उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांना मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. आनंद मेळ्यामुळे संपूर्ण शाळा परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
दुपारच्या सत्रात मातृसंमेलन (सप्तशक्ती संगम) हा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संध्या शेटे होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्योती भाला उपस्थित होत्या. विशेष उपस्थिती म्हणून सारिका खबुतरे यांची उपस्थिती लाभली.
या वेळी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निर्मला खुर्दे, पर्यवेक्षक संजय पिवटे व सतीश शेटे उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना ज्योती भाला यांनी मातांची कुटुंब व समाज घडविण्यातील भूमिका सविस्तरपणे स्पष्ट केली. आजच्या काळात माता घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच मुलांवर योग्य संस्कार बिंबवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. मुलांना स्वावलंबी, सुजाण व जबाबदार नागरिक घडविणे ही आईची मुख्य जबाबदारी असून, मुलांच्या प्रत्येक पावलावर आईचे सूक्ष्म लक्ष असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच मोबाईलचा अतिवापर व त्यातून उद्भवणारे धोके, पुरेशी झोप तसेच रुचकर व पौष्टिक आहार यांकडे मातांनी विशेष लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.
सप्तशक्ती संगम या संकल्पनेविषयी माहिती देताना ज्योती भाला यांनी महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, चामुंडा, इंद्राणी व ब्रह्माणी या सप्तशक्तींचे सविस्तर विवेचन केले. या सप्तशक्ती स्त्रीशक्तीचे प्रतीक असून प्रत्येक माता या शक्तींचा अंगीकार करून सक्षम कुटुंब व सुदृढ समाजनिर्मिती करू शकते, असे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले.
मातृसंमेलनाच्या निमित्ताने देशसेवेसाठी आपल्या सुपुत्रांना सैन्यात पाठवलेल्या मातांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये रूपाली तरमळे (सरपंच, पिंपळगाव सराई), सविता नरवाडे (माजी सरपंच, सावळी), रंजना राजपूत व जनाबाई तरमळे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मातृसंमेलनानिमित्त उपस्थित मातृशक्तीसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये सहा माता-पालकांना मान्यवरांच्या हस्ते पैठण्या प्रदान करण्यात आल्या.
यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या चौथ्या टप्प्यात संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवनावर आधारित लघुनाटिका विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केली. ही नाटिका रवींद्र खानंदे व सुहास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आली असून, तिने उपस्थितांची विशेष दाद मिळविली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख वैशाली मांजाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निर्मला खुर्दे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी विद्यालयाच्या उपक्रमशीलतेचे, शिक्षकांच्या परिश्रमांचे व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले.