logo

मनुवाद्यांचे बंधुत्व हा केवळ साडेतीन टक्क्यांचा खेळ – सुकुमार कांबळे दुसरी समता परिषद उत्साहात; महामानवांचे अपहरण करून राजकारण – विजय मांडके


कराड, दि. ३ :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजेशाही व्यवस्था संपवून संविधानाच्या माध्यमातून देशात लोकशाही प्रस्थापित केली. मात्र आज जाती-जातींत फूट पाडून सत्तेच्या जोरावर काही बहुजन घटकांना सोबत घेऊन संविधान बदलण्याचा भ्रम काहींनी बाळगला आहे. शंकराचार्य जन्मावरून माणसाची ओळख ठरवतात आणि तेच आज बंधुत्वाची भाषा करतात, हा मनुवाद्यांचा कुटील डाव असून, वर्णव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्यांचा हा केवळ साडेतीन टक्क्यांचा खेळ आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ विचारवंत व डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक सुकुमार कांबळे यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कराड नगरपालिकेने मानपत्र प्रदान केल्याच्या ८६ व्या स्मृतिदिनानिमित्त समता सामाजिक विकास संस्था, कराड यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या समता परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या परिषदेस ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत विजय मांडके, संविधान अभ्यासक ॲड. संभाजीराव मोहिते, महाराष्ट्र राज्य भाषा व संस्कृती मंडळाच्या माजी सदस्या फरझाना इकबाल, वेणुताई चव्हाण कॉलेज, कराडचे माजी प्राचार्य बी. एन. कालेकर, समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंदराव लादे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
सुकुमार कांबळे म्हणाले, मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मात बंधुता नाही आणि ती फक्त हिंदू धर्मातच आहे, हा दावा खोटा आहे. दोन जाती कधीही एक होत नाहीत, हे बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले होते. १९३२ सालीच त्यांनी ‘मागासवर्गीय हिंदू नाहीत’ हे ठामपणे मांडले. आर्थिक निकष नाकारून सामाजिक आधारावर आरक्षणाची भूमिका त्यांनी घेतली होती.
बुद्धकाळात वैश्विक समतेची व्यवस्था अस्तित्वात होती. हिंदू धर्माला ना संस्थापक आहे, ना अधिकृत धर्मग्रंथ. गीतेला धर्मग्रंथाचा दर्जा देण्याची मागणी न्यायालयानेही मान्य केलेली नाही. त्यामुळे हिंदुत्वाच्या तथाकथित बंधुत्वाला घाबरू नका, असे आवाहन त्यांनी केले.
ज्यांनी शिवरायांचे क्षत्रियत्व नाकारले, राज्याभिषेकाला विरोध केला, त्यांनीच राजर्षी शाहू महाराजांना कायदेमंडळात प्रवेश दिला नाही. संभाजी महाराजांचा खोटा इतिहास मांडण्यात आला. केवळ जातीच्या आधारावर बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, महात्मा फुले यांना नाकारण्यात आले. जात हे विष असून विकासातील सर्वात मोठा अडथळा आहे. बाबासाहेबांनी लिहिलेली घटना जशीच्या तशी स्वीकारली असती तर आज जात अस्तित्वातच राहिली नसती. घटनेतील बंधुत्व स्वीकारण्यास हे लोक का घाबरतात, असा सवाल उपस्थित करत संविधानाच्या चौकटीला हात घातल्यास तीव्र प्रतिकार केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी बोलताना विजय मांडके म्हणाले, महात्मा गांधी यांच्या हत्येला वृत्तपत्रात केवळ एका ओळीची जागा मिळते, तर बाबासाहेबांच्या शाखा भेटीला सात ओळी दिल्या जातात, हे नेमके काय सूचित करते? संघाला तब्बल ८५ वर्षांनंतर बंधुत्वाची आठवण का झाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महामानवांची नावे घेऊन आज राजकारण केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
संविधान अभ्यासक ॲड. संभाजीराव मोहिते म्हणाले, जगभरात भारताच्या संविधानाचे महत्त्व मान्य केले जाते; मात्र आपण स्वतः संविधानातील एकही पान वाचत नाही, हे दुर्दैव आहे. संविधान आपला श्वास बनला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
प्रस्ताविकात आनंदराव लादे यांनी समता परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करत, बाबासाहेबांचा पाईक बनून संविधान वाचवण्याचा लढा सुरूच राहील, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कोठावळे यांनी केले. प्रार्थना वैशाली सोनवणे, तर आभार ॲड. स्वप्निल भिसे यांनी मानले. परिषदेस मोठ्या संख्येने आंबेडकरवादी, दलित व नागरिक उपस्थित होते.
परिषदेत तीन ठराव एकमताने मंजूर
परिषदेत तीन महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कराड नगरपालिकेचे मानपत्र स्वीकारताना केलेल्या मूळ भाषणाचे शिल्प पालिकेच्या दर्शनी भागात उभारावे.
कराड भेटीचा विपर्यास करून खोटा इतिहास मांडणाऱ्या संस्थेचा जाहीर निषेध करावा.
खोट्या इतिहासाविरोधात वैचारिक लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.
कुंभमेळ्याला १४ हजार कोटी, कर्जमाफीला पैसे नाहीत
कुंभमेळ्यासाठी सरकार १४ हजार कोटी रुपये खर्च करते; मात्र शेतकऱ्यांसाठी २०० कोटींची कर्जमाफी शक्य होत नाही. २० विद्यार्थ्यांचा निकष लावून राज्यातील १५ हजार प्राथमिक शाळा बंद केल्याने सुमारे २० लाख विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्याचा आरोपही सुकुमार कांबळे यांनी केला.

0
0 views