
रायपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई: अत्याचार करणाऱ्या आरोपीला तासाभरात ठोकल्या बेड्या.
रायपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई: अत्याचार करणाऱ्या आरोपीला तासाभरात ठोकल्या बेड्या
रायपूर (प्रतिनिधी):
आंध्रप्रदेश येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सैलानी येथे वास्तव्यास असलेल्या एका २५ वर्षीय महिलेवर बळजबरीने अत्याचार करणाऱ्या नराधमाला रायपूर पोलिसांनी अवघ्या एका तासात अटक केली आहे. रामदास गंगाराम शिंदे (वय ३८, रा. सैलानी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी पीडित महिलेने रायपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, आरोपी रामदास शिंदे याने पीडितेला 'ओलांड्यावर आंघोळीला नेतो' असे आमिष दाखवून तुरीच्या शेतात नेले. तिथे त्याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. पीडित महिलेने आरडाओरड केल्यानंतर आवाजाच्या दिशेने सैलानी येथील दोन तरुण धावून आले. त्यांनी पीडितेची आरोपीच्या तावडीतून सुटका केली, मात्र संधी पाहून आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला होता.
पोलिसांची वेगवान कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. निलेश सोळंके यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. ठाणेदारांसह हेड कॉन्स्टेबल शितोळे, राहुल जाधव, लक्ष्मण शिंदे, काझी, कळमकर, मोरे आणि चव्हाण यांच्या पथकाने विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. गुन्ह्याची नोंद होताच (अपराध क्र. ०१/२०२६, कलम ६४ (१) BNS) पोलिसांनी अवघ्या एका तासाच्या आत आरोपी रामदास शिंदे याला शोधून काढून त्याला ताब्यात घेतले.
पुढील तपास सुरू
सदर आरोपीला अटक करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार निलेश सोळंके आणि पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंदे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. या धडाकेबाज कारवाईमुळे रायपूर पोलिसांचे परिसरातून कौतुक होत आहे.