logo

स्थळ पाहणी नाही, निर्णय नाही; उपोषण सुरू असतानाच अर्जाची नोंद

स्थळ पाहणी नाही, निर्णय नाही; उपोषण सुरू असतानाच अर्जाची नोंद
उपोषण माघार घेण्याच्या आधीच प्रशासनाकडून पत्राची नोंद; देऊळवाडी रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
देऊळवाडी (ता. उदगीर)
देऊळवाडी गावातील पांदन रस्ते, अंतर्गत रस्ते तसेच देऊळवाडी ते गुंडोपंत दापका रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत केंद्रे प्रकाश मधुकर यांनी अन्नत्याग उपोषणाचा इशारा दिला होता.
या संदर्भात केंद्रे प्रकाश मधुकर यांनी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे लेखी अर्ज सादर केले होते. मुख्यमंत्री कार्यालयाकडेही थेट अर्ज करूनही कोणतीही चौकशी किंवा स्थळ पाहणी न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शेतकरी, विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिक तसेच आपत्कालीन सेवांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक 25 डिसेंबर 2025 पासून आदर्श गाव देऊळवाडी ग्रामपंचायत समोर अन्नत्याग उपोषणास बसण्याचा निर्णय केंद्रे यांनी जाहीर केला होता.
मात्र उपोषण माघार घेण्याच्या अगोदरच प्रशासनाने संबंधित पत्राची अधिकृत नोंद आपल्या रेकॉर्डवर जमा केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले की केवळ कागदी पूर्तता करण्यात आली, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. प्रत्यक्ष स्थळ पाहणी व ठोस निर्णय केव्हा होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
दरम्यान, “जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री स्वतः दखल घेऊन न्याय देत नाहीत, तोपर्यंत लढा सुरूच राहील,” असा ठाम इशारा केंद्रे प्रकाश मधुकर यांनी दिला आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणाकडे आता प्रशासन खर्‍या अर्थाने लक्ष देणार का, की केवळ कागदावरच कारवाई होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

114
5522 views