logo

जनता विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे द्वितीय पुष्प भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न


पिंपळगाव सराई | दि. २ जानेवारी २०२६
जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे सुरू असलेल्या ‘उड्डाण’ या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या द्वितीय पुष्पाचे आयोजन विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या प्रभावी सादरीकरणाने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सहभागाने व पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण परिसर आनंद व चैतन्याने भारलेला दिसून आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, चिखलीचे सचिव प्रेमराजजी भाला हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मा. रामदासजी निमावत, विद्यालयाचे स्थानिक सल्लागार तथा धाड तालुका संघचालक सुभाषजी बारस्कर, सदाशिवराव शिंदे, रमेशजी देशमाने, विद्यालयाचे प्राचार्य प्रमोदजी ठोंबरे, पर्यवेक्षक संजयजी पिवटे तसेच स्नेहसंमेलन प्रमुख सतीशजी शेटे यांची मान्यवर उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात शांती, ऐक्य व स्वातंत्र्याचे प्रतीक असलेली कबूतर हवेत सोडून करण्यात आली. त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य प्रमोदजी ठोंबरे यांनी स्नेहसंमेलनामागील संकल्पना स्पष्ट करत प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विज्ञान प्रदर्शनी, हस्तकला प्रदर्शनी आणि चित्रकला प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलता, कल्पकता आणि कौशल्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे मांडण्यात आल्या, तर हस्तकला व चित्रकलेतून विद्यार्थ्यांची सर्जनशील दृष्टी ठळकपणे दिसून आली.

सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी सादर केलेली नृत्ये, समूहगीत, एकांकिका व नाट्यछटा यांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक सादरीकरणात सामाजिक जाणिवा, सांस्कृतिक मूल्ये आणि शिस्तबद्ध सादरीकरण यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहासजी कुलकर्णी यांनी प्रभावी, संयत व रसपूर्ण शैलीत केले, तर आभार प्रदर्शन विवेकजी गवते यांनी केले.

या प्रसंगी उपस्थित पालक बंधू-भगिनींनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसांच्या स्वरूपात आर्थिक सहकार्य करत आपला उत्साह व्यक्त केला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण झाली.

एकूणच ‘उड्डाण’ स्नेहसंमेलनाचे द्वितीय पुष्प शैक्षणिक, सांस्कृतिक व नैतिक मूल्यांनी परिपूर्ण ठरत, आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाले.

70
7085 views