
कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्काराने लोणीतील ज्येष्ठ शेतकरी गनिभाई सय्यद सन्मानित
लोणी (धामणी) प्रतिनिधी – तेजस वाळुंज
जय किसान फार्मर्स फोरम, गोदावरी बायो फर्टी. इंडस्ट्रीज आणि ‘आमची माती आमची माणसं’ यांच्या संयुक्त सहकार्यातून देण्यात येणारा भारताचे पहिले कृषिमंत्री कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार लोणी (ता. आंबेगाव) येथील ज्येष्ठ, कष्टकरी व शेतीनिष्ठ शेतकरी गनिभाई हुसेन सय्यद यांना प्रदान करण्यात आला. नाशिक येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात आमदार राहुल टिकले यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. जयराम पुरकर, मल्टिमोल मायक्रो फर्टिलायझर इंडस्ट्रीजचे शशिकांत शेट्टी, विविध भारतीचे राष्ट्रीय सेवा प्रमुख डॉ. संतोष जाधव, ओम गायत्री ग्रुपचे मधुकर गवळी, इफकोच्या संचालिका साधना जाधव, राजविलास गायकवाड, सेंद्रिय शेतीतज्ज्ञ सदुभाऊ शेळके तसेच भारतीय अन्न महामंडळाचे सदस्य बापूसाहेब शिंदे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह्याद्री फार्म्सचे संस्थापक अध्यक्ष विलास शिंदे होते.
‘आमची माती आमची माणसं’चे संपादक प्रा. डॉ. संजय जाधव यांच्या निमंत्रणावरून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास राज्यभरातून शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी गनिभाई सय्यद यांचा त्यांच्या सुविद्य पत्नीसह गौरव करण्यात आला.
सन्मान स्वीकारताना गनिभाई सय्यद म्हणाले की, शेतीतील किड नियंत्रण व पिकांच्या सकस वाढीसाठी संशोधनाधारित औषधे विकसित करताना अनेक अडचणी आल्या, मात्र हा पुरस्कार लोणी गावासह पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांच्या मेहनतीचा सन्मान आहे. या गौरवामुळे परिसरातील शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक समृद्ध करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.