logo

प्रशासनाचा मनमानी कारभार! अमरापूरच्या ग्रामसेवकांकडून माहिती अधिकारात कोरी कागदपत्रे; पंचायत समितीचेही दुर्लक्ष

शेवगाव (प्रतिनिधी):
तालुक्यातील अमरापूर येथील ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार समोर आला आहे. एका सजग नागरिकाने माहिती अधिकारांतर्गत (RTI) मागवलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर 'सत्यप्रत' म्हणून शिक्के देण्यास ग्रामसेवकांनी नकार दिला आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात शेवगाव पंचायत समितीकडे तक्रार करूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
अमरापूर येथील एका अर्जदाराने ग्रामपंचायत स्तरावरील कामांची माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला होता. नियमानुसार, माहिती अधिकारामध्ये दिली जाणारी प्रत्येक प्रत ही संबंधित सक्षम अधिकाऱ्याच्या सही-शिक्यानिशी 'सत्यप्रत' करून देणे बंधनकारक आहे. मात्र, अर्जदाराने छायांकित प्रतींवर शिक्के आणि मुद्रांक मागितले असता, ग्रामसेवकांनी ते देण्यास स्पष्ट नकार दिला.
अजब कारण आणि टाळाटाळ
"शिक्के किंवा मुद्रांक उपलब्ध नाहीत" किंवा तत्सम तांत्रिक कारणे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे. सही-शिक्याशिवाय असलेल्या कागदपत्रांना कायदेशीर आधार उरत नाही, त्यामुळे प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्याऐवजी ती दडपण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून होत असल्याचे दिसत आहे.
ग्रामसेवकाच्या या मनमानी कारभाराची तक्रार अर्जदाराने शेवगाव पंचायत समितीकडे केली आहे. मात्र, तक्रार देऊनही गटविकास अधिकाऱ्यांनी (BDO) किंवा संबंधित विभागाने यावर कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही. यामुळे "दप्तरदिरंगाई" करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठांचे अभय आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
माहिती अधिकाराची पायमल्ली करणाऱ्या संबंधित ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करावी आणि रितसर सही-शिक्यानिशी माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जर तातडीने कारवाई न झाल्यास वरिष्ठ कार्यालयासमोर उपोषणाचा इशाराही दिला जात आहे.

169
7397 views