logo

वन विभागाचे भरारी पथक 'कागदावरच', शेवगावात लाकूड तस्करांचा 'सुळसुळाट'

शेवगाव | प्रतिनिधी
तालुक्यातील वनक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून अवैध लाकूडतोडीने उच्छाद मांडला असून, वन विभागाची यंत्रणा मात्र सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे. वन विभागाचे 'भरारी पथक' केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याने लाकूड तस्करांचे धाडस वाढले असून, रात्रीच्या अंधारात राजरोसपणे मौल्यवान वृक्षांची कत्तल करून तस्करी सुरू आहे.
रात्रीच्या अंधारात 'ऑपरेशन लाकूड'
मिळालेल्या माहितीनुसार, शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव, सामनगाव आणि परिसरातील वनजमिनींवर तस्करांची वक्रदृष्टी पडली आहे. दिवसा रेकी करून रात्रीच्या वेळी कटरच्या साहाय्याने निंब, बाभळी आणि सागाची झाडे जमीनदोस्त केली जातात. पहाटेच्या सुमारास ही लाकडे चोरट्या मार्गाने ट्रॅक्टर किंवा टेम्पोद्वारे लाकूड डेपो अथवा फर्निचर कारखान्यांकडे रवाना केली जातात.
वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी वन विभागाने स्थापन केलेले भरारी पथक नेमके काय काम करत आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. गस्त घालण्यासाठी दिलेली वाहने आणि कर्मचारी प्रत्यक्ष फिल्डवर न दिसता कार्यालयातच बसून असल्याचे आरोप होत आहेत. तस्करांना वन कर्मचाऱ्यांचे अभय तर नाही ना? अशी शंकाही आता उपस्थित केली जात आहे.
एकीकडे शासन 'झाडे लावा, झाडे जगवा' असा नारा देत कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, दुसरीकडे तयार असलेली झाडे तस्कर तोडून नेत आहेत. यामुळे परिसरातील निसर्गाचा समतोल बिघडत असून तापमानात वाढ होत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही वन अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा 'पंचनामा' प्रत्यक्ष परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे.

71
2595 views