logo

परमपूज्य प्रमुख स्वामीजी महाराज अमळनेर आगमन सुवर्णमहोत्सव व स्वामीनारायण मंदिर वर्धापन दिन उत्साहात साजरा

परमपूज्य प्रमुख स्वामीजी महाराज अमळनेर आगमन सुवर्णमहोत्सव व स्वामीनारायण मंदिर वर्धापन दिन उत्साहात साजरा


अभिषेक, महायज्ञ, शोभायात्रेसह दोन दिवसीय धार्मिक सोहळा; हजारो भाविकांची उपस्थिती


अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
परमपूज्य प्रमुख स्वामीजी महाराज यांच्या कृपेमुळे सुमारे पन्नास वर्षांपूर्वी शरद ऋतूमध्ये अमळनेर येथे झालेले पावन आगमन आणि त्याचबरोबर स्वामीनारायण मंदिर अमळनेरच्या २९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथे भव्य व दिव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही पावन पर्वांच्या निमित्ताने आयोजित सोहळ्याला अमळनेर तालुक्यासह जिल्ह्यातील व बाहेरगावाहून आलेल्या हजारो भाविकांची मोठी उपस्थिती लाभली.
स्वामीनारायण मंदिर अमळनेर आगमन सुवर्णमहोत्सव निमित्ताने
दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर
दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी अभिषेक दर्शन, महायज्ञ, धार्मिक सभा, महाप्रसाद तसेच भव्य शोभायात्रा असे विविध कार्यक्रम पार पडले. या सर्व कार्यक्रमांचा हजारो भाविकांनी भक्तिभावाने लाभ घेतला.
या मंगलप्रसंगी पूज्य ज्ञानेश्वर स्वामीजी कोठारी (स्वामीनारायण मंदिर, सारंगपूर) यांची विशेष उपस्थिती लाभली होती, तसेच पूज्य आनंद जीवन स्वामीजी कोठारी (स्वामीनारायण मंदिर, धुळे) यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान पूज्य आनंद जीवन स्वामीजी यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले की,
“भगवंताचे नामस्मरण करणे हेच खरे जीवनाचे सार आहे. भगवंत व संतांची कृपा अपार असून आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले आहे, त्याबद्दल कृतज्ञता ठेवणे आवश्यक आहे. दानधर्म व सेवा हीच खरी साधना असून संपत्ती क्षणभंगुर आहे—आज आहे, उद्या नसेल.”
यावेळी पूज्य ज्ञानेश्वर स्वामीजी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
“आपण जे सतत स्मरण करतो, तेच आपले जीवन बनते. अहंकारात कधीही शांती मिळत नाही. जीवनात भगवंत व संतांचे चिंतन असेल तरच उत्सव सार्थ ठरतात.”
प्रमुख स्वामी महाराज सतत भ्रमण करत असत, भगवंताचे नामस्मरण करत असत. भगवंताचे चरित्र श्रवण केल्यानेच भक्तांना खरा आध्यात्मिक लाभ होतो, असेही त्यांनी नमूद केले.
“खऱ्या संतांना ओळखण्यासाठी खरे भक्त असणे आवश्यक आहे,” असा मौलिक संदेश त्यांनी दिला.

या भव्य कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून
पूज्य योगी स्नेह स्वामीजी (संत निर्देशक, संत खान्देश)आणि पूज्य अखंडमुनि स्वामीजी (बालप्रवृत्ती निर्देशक, संत खान्देश)
यांनी मोलाची भूमिका बजावली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बीएपीएस स्वामीनारायण सत्संग मंडळ, सर्व सेवकवर्ग, मित्रपरिवार व भाविकांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी उपस्थित सर्व स्वामींचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर भाविकांनी विशेष उपस्थित स्वामींचा आशीर्वाद घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी स्वामीनारायण मंदिर परिसरात स्वामींच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. अमळनेर तालुक्यासह बाहेरगावाहून आलेल्या भाविकांनी मंदिर दर्शनाचा लाभ घेतला.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, मुंबईनंतर अमळनेरचे स्वामीनारायण मंदिर हे महाराष्ट्रातील केवळ दुसरे मंदिर असून राज्यात अशी फक्त दोनच मंदिरे आहेत, ही अमळनेरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सुसंचालन शामकांत बागडे यांनी प्रभावीपणे केले. यावेळी सुवर्ण महोत्सव स्वामीनारायण मंदिर वर्धापन दिनाच्या बातम्यांना विशेष प्रसिद्धी दिल्यामुळे उत्कृष्ट लेखन केल्याबद्दल महाराजांनी कौतुक केले व पाठीवर शाबासकीची थाप दिली याबद्दल पत्रकार ईश्वर महाजन यांचा पूज्य ज्ञानेश्वर स्वामीजी व पूज्य आनंद जीवन स्वामीजी यांनी सत्कार केला..
या सुवर्णमहोत्सवी व वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामुळे अमळनेरच्या धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक जीवनात नवचैतन्य निर्माण झाले असून हा उत्सव भाविकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणीय राहणार आहे.

3
199 views