logo

श्रीराम फायनान्सच्या नावाखाली दुचाकी हिसकावून युवकाला बेदम मारहाण; दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी

लोणंद : श्रीराम फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी असल्याचा भास निर्माण करून दुचाकी मोटरसायकल जबरदस्तीने हिसकावून घेत फिरोज शेख या युवकास लोणंद येथे बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी म. प्र. झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने करण्यात आली आहे.
कोणत्याही कारणास्तव वाहनाचा हप्ता थकला असल्यास वसुलीसाठी येणाऱ्या व्यक्तींकडे अधिकृत ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. तसेच जबरदस्ती, धमकी अथवा मारहाण करून वाहन जप्त करणे हे पूर्णतः बेकायदेशीर असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकिंग प्रक्रिया नियमांमध्ये स्पष्ट केले आहे. मात्र, या नियमांना बगल देत काही फायनान्स कंपन्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मदतीने बळाचा वापर करून वाहन जबरदस्तीने जप्त करीत असल्याचे प्रकार वाढत आहेत, असे मत झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. अभिजीत (सनी) ननावरे यांनी व्यक्त केले.
अशा बेकायदेशीर कृत्यांवर तात्काळ कारवाई करणे आवश्यक असून पोलीस प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या काळात फायनान्स कंपन्यांकडून मनमानी व बेकायदेशीर वसुली सुरू राहिल्यास संघर्ष नायक मा. भगवानरावजी वैराट साहेब यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे तालुकाध्यक्ष श्री. प्रवीण संकपाळ, फलटण तालुक्याचे कार्याध्यक्ष श्री. सिताराम मसुगडे, फिरोज शेख, उमेश गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

2
67 views