logo

अनधिकृत बांधकामाबाबतचे शपथपत्र घेणार



अनेक इच्छुकांचे टेन्शन वाढले, अपात्रतेची टांगती तलवार

जळगाव : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या इच्छुकांचे प्रशासनाने टेन्शन वाढविले आहे. माझ्या कुटुंबाने कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही, असे लेखी शपथपत्र आता प्रत्येक उमेदवाराला द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे, निवडून आल्यानंतर जरी असे बांधकाम सिद्ध झाले, तरी थेट नगरसेवकपद रद्द होण्याची टांगती तलवार उमेदवारांवर असणार आहे. या निर्णयामुळे अनेक इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत.

शपथपत्रात पहिल्यांदाच कुटुंबातील सदस्यांच्या बांधकामाचा मुद्दा समाविष्ट केल्यामुळे केवळ उमेदवारालाच नाही, तर

त्याच्या पूर्ण कुटुंबाला नियमाच्या चौकटीत राहावे लागणार आहे. विरोधकांसाठी हा आयता मुद्दा मिळणार असून, निवडणुकीच्या काळात एकमेकांच्या अनधिकृत बांधकामांची पोलखोल करण्याची चढाओढ आता रंगणार आहे. जर एखाद्या उमेदवाराने खोटे शपथपत्र दिले आणि नंतर चौकशीत त्याचे बांधकाम अनधिकृत आढळले, तर त्याचे नगरसेवकपद तत्काळ रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

शहरातील काही माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनाही आता या शपथपत्राचे टेन्शन आले आहे

शहरात गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट आहे. अनेक माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार स्वतःच अशा बेकायदा इमारतींमध्ये वास्तव्यास आहेत किंवा त्यांचे व्यावसायिक गाळे अनधिकृत जागेवर उभे आहेत. ज्या प्रशासनाने ही बांधकामे रोखणे अपेक्षित होते, त्यांनीच आता अशा शपथपत्राची अट घातल्याने शहरात याची चर्चा रंगली आहे.

मस्ट READ

ठाणे पॅटर्नची जळगावात धास्ती

ठाणे शहरात अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून १४ सहायक आयुक्तांची चौकशी सुरू आहे. दिवा, मुंबा आणि कळवा यासारख्या भागात २० टक्के बांधकामे अनधिकृत असून, तिथे अनेक लोकप्रतिनिधींचे हितसंबंध गुंतलेले आहेत. जळगावातही परिस्थिती वेगळी नाही. अनधिकृत ले-आउट आणि बांधकामांचे पेव फुटले असून, यात अनेक राजकीय नेत्यांचा वरदहस्त आहे. आता या शपथपत्रामुळे अशा नेत्यांची गोची होणार आहे.

काय आहे नवीन नियम ?

निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला अर्जासोबत एक प्रतिज्ञापत्र जोडावे लागेल. त्यात प्रामुख्याने स्वतः, पत्नी किंवा अवलंबून असलेल्या सदस्यांनी कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही. भविष्यात असे बांधकाम केल्याचे किंवा त्यात सहभागी असल्याचे आढळल्यास पद रद्द होण्यास पात्र राहीन, असे शपथपत्रात नमूद करावे लागणार आहे.

0
333 views