
उर्दू शाळेच्या मंताषाने मंत्रिमंडळाची माहिती केली तोंडपाठ
डोणगाव प्रतिनिधी : सालार बेग
डोणगाव येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक मुलांची शाळा, डोणगाव येथील इयत्ता चौथी ‘ब’ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी मंताषा शेख सलीम हिने आपल्या अफाट स्मरणशक्तीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण मंत्रिमंडळातील मंत्रीमहोदयांची नावे पदनामासह उर्दू भाषेत पाठ करून तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
मंताषा हिने अत्यंत कमी वेळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सर्व कॅबिनेट मंत्र्यांची नावे उर्दू भाषेत अचूकपणे तोंडपाठ सांगितली असून ती लिहूनही दाखवली. तिच्या या बुद्धिमत्तेचे व मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांनी मंताषाचे अभिनंदन केले आहे. लहान वयातच राजकीय व प्रशासकीय माहिती इतक्या अचूकपणे आत्मसात करणे ही अभिमानाची बाब असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
मंताषाच्या या यशामागे शाळेतील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही असाधारण गुणवत्ता दडलेली असते, याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे बोलले जात आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रामस्थांनीही तिचे विशेष अभिनंदन केले आहे