logo

दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक पावलावर गणिताचे अधिष्ठान – डॉ. मनीष देशपांडे

ने.सु.बो महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा

नांदेड :
नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या गणित व संख्याशास्त्र विभागाच्या वतीने थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुग्रीव फड हे होते. प्रमुख वक्ते म्हणून पदार्थविज्ञान विभागप्रमुख डॉ. मनीष देशपांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्त महाविद्यालय, हदगाव येथील गणित विभागप्रमुख प्रा. डॉ. बी. बी. पंडित उपस्थित होते.

प्रमुख वक्ते डॉ. मनीष देशपांडे यांनी मार्गदर्शन करताना “दैनंदिन जीवनात गणित विषयाचे महत्त्व अनन्यसाधारण असून मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्रात गणिताचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वापर होत आहे तसेच दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक पावलावर गणिताचे अधिष्ठान महत्वाचे आहे असे प्रतिपादन केले. त्यांनी श्रीनिवास रामानुजन तसेच इतर भारतीय गणितज्ञांचे गणित विषयातील योगदान स्पष्ट करत विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची रुची व जाणीव निर्माण केली.
प्रा. डॉ. बी. बी. पंडित यांनी आधुनिक युगात, विशेषतः संगणक शास्त्र, तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात गणिताच्या वाढत्या उपयोगावर सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सुग्रीव फड यांनी गणित विषयाचे करिअरच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे आयोजन संख्याशास्त्र विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ. किशोर इंगळे व गणित विभाग प्रमुख डॉ. आशा मेश्राम यांनी केले. प्रास्ताविक प्रा. विजय मठपती यांनी केले. बी.एस्सी. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु. प्रणिता मरेपल्ले हिने श्रीनिवास रामानुजन यांच्या शैक्षणिक कार्यावर माहिती दिली. सूत्रसंचालन कु. गौरी देशमुख हिने तर आभार कु. शीतल राठोड हिने मानले.
या वेळी गणित मंडळाचे उद्घाटन व भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. गणित प्रश्नमंजुषा, सूत्र स्पर्धा व पोस्टर प्रदर्शन असे विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमास प्रा. डॉ. पंकज यादव, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

2
213 views