
स्वामीनारायण मंदिर वर्धापन दिनानिमित्त अमळनेरमध्ये दिव्य अध्यात्मिक पर्व
स्वामीनारायण मंदिर वर्धापन दिनानिमित्त अमळनेरमध्ये दिव्य अध्यात्मिक पर्व
स्वामीनारायण मंदिराच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल
श्रद्धा, सेवा आणि संस्कारांचा संगम अमळनेरमध्ये
प्रमुख स्वामीजी महाराजांच्या पावन आठवणींना अभिवादन करणारा अध्यात्मिक महोत्सव
अमळनेर प्रतिनिधी :( ईश्वर महाजन)
अमळनेर नगरीत अध्यात्म, भक्ती आणि संस्कारांचा मंगल संगम घडवणारा ऐतिहासिक क्षण साकारत आहे. परमपूज्य प्रमुख स्वामीजी महाराज यांच्या अमळनेर आगमनाच्या सुवर्ण स्मृतीनिमित्त तसेच स्वामीनारायण मंदिराच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य व दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी परमपूज्य प्रमुख स्वामीजी महाराज यांनी अमळनेरला दिलेल्या पावन भेटीच्या स्मृती आजही भाविकांच्या हृदयात कोरल्या आहेत. त्या स्मरणीय प्रसंगाचा सुवर्ण महोत्सव आणि मंदिराचा वर्धापन दिन—या दोन्ही पावन प्रवाहांचा संगम साधत भक्तांसाठी आध्यात्मिक उन्नतीचा अनुपम योग जुळून आला आहे. हा सोहळा भक्ती, सेवा, संस्कार आणि समर्पण या स्वामीनारायण परंपरेच्या मूल्यांचे दर्शन घडवणारा ठरणार आहे.
या मंगल प्रसंगी पूज्य ज्ञानेश्वर स्वामीजी (कोठारी स्वामीनारायण मंदिर, सारंगपूर) तसेच पूज्य जे. आनंदजीवन स्वामीजी (कोठारी स्वामीनारायण मंदिर, धुळे) यांची विशेष उपस्थिती लाभणार असून त्यांच्या दिव्य व प्रेरणादायी वाणीतून भक्तांना आत्मिक बळ आणि अध्यात्मिक दिशा मिळणार आहे.
पूज्य ज्ञानेश्वर स्वामीजी : व्यक्तिमत्त्व आणि कार्य
पूज्य ज्ञानेश्वर स्वामीजी यांनी १९७२ साली बी.ई. (सिव्हिल) पदवी संपादन केली असून १९७३ मध्ये त्यांनी दीक्षा स्वीकारली.
ते सारंगपूर येथील बीएपीएस संस्थेच्या ११० वर्षे जुन्या मंदिराचे मुख्य कोषाध्यक्ष,
बीएपीएस संत प्रशिक्षण केंद्राचे मुख्य शिक्षक,
तसेच बीएपीएस संस्थेच्या कोअर कमिटीतील बांधकाम विभागाचे प्रमुख संत म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
उत्कृष्ट वक्ता, संस्कृत विद्वान, लेखक, कवी आणि कुशल संघटक अशी त्यांची बहुआयामी ओळख असून आध्यात्मिक गुणांनी ते परिपूर्ण आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने असंख्य भक्तांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली आहे.
कार्यक्रमाचे नियोजन पुढीलप्रमाणे :
दि. २६ डिसेंबर २०२५
▪️ रात्र सभा : रात्री ९.०० ते १०.००
दि. २७ डिसेंबर २०२५
▪️ अभिषेक दर्शन : सकाळी ८.०० ते ८.३०
▪️ महायज्ञ : सकाळी ८.३० ते १०.३०
▪️ मुख्य सभा : सकाळी १०.३० ते ११.३०
▪️ भव्य शोभायात्रा : दुपारी ४.०० ते ७.००
हा दिव्य सोहळा भक्तांना आत्मिक शांती, सद्भावना आणि संस्कारांची अनुभूती देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
सदर कार्यक्रमाचे निमंत्रक पूज्य योगीस्नेह स्वामीजी (संत निर्देशक, संत खानदेश), पूज्य अखंडमुनी स्वामीजी (बालप्रवृत्ती निर्देशक, संत खानदेश) तसेच बीएपीएस स्वामीनारायण सत्संग मंडळ, अमळनेर यांनी भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अध्यात्मिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
भक्ती, सेवा आणि श्रद्धेच्या या दिव्य उत्सवात सहभागी होऊन जीवन धन्य करण्याची ही सुवर्णसंधी अमळनेरवासीयांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.