logo

प्रामाणिकपणा, परिश्रम व विनम्रतेतून यशाची गुरुकिल्ली – प्रा. गणेशन कन्नबीर

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ उत्साहात
जळगाव | दि. २३ :
“आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी नव्हे, तर कौशल्य, चारित्र्य आणि सामाजिक जाणीव आवश्यक आहे. प्रामाणिकपणा, अथक परिश्रम व विनम्रता हे गुण आत्मसात केले तर यश निश्चित आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेचे संचालक प्रा. गणेशन कन्नबीरन यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३४ व्या दीक्षांत समारंभात ते दीक्षांत भाषण देत होते.
मंगळवार दि. २३ डिसेंबर रोजी विद्यापीठात हा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता, प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.
प्रा. कन्नबीरन यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर सविस्तर भाष्य करताना सांगितले की, या धोरणामुळे भारतातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे. भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणारे न राहता नोकरी देणारे बनण्याची मानसिकता विकसित केली पाहिजे. पारंपरिक शिक्षण पद्धतीतील सैद्धांतिक दृष्टिकोनापेक्षा नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्याधिष्ठित शिक्षण, प्रात्यक्षिके, फील्डवर्क, आंतरवासियता आणि वास्तवातील समस्यांवर आधारित प्रकल्पांवर भर देण्यात आला आहे.
आजच्या काळात नोकऱ्या या शैक्षणिक पात्रतेपेक्षा कौशल्यांशी अधिक जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे हार्ड स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्सचा समतोल विकास आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षणाचा उद्देश केवळ बौद्धिक विकास नसून चारित्र्य घडविणे व सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक नागरिकत्व ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कौशल्ये, सहिष्णुता आणि शाश्वत विकासाची जाणीव निर्माण करणे महत्त्वाचे आहे. भारत विविधतेने नटलेला देश असून एकात्मतेतूनच प्रगती साधता येईल, असेही त्यांनी नमूद केले. योगा व ध्यानाच्या माध्यमातून अंतर्गत शक्तीचा विकास होत असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याने योगा आपल्या जीवनाचा भाग करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी स्नातकांना उद्देशून प्रामाणिकपणा, राष्ट्रप्रेम आणि ‘राष्ट्र प्रथम’ हे तत्व कायम अंगीकारण्याचा संदेश दिला. त्यांनी विद्यापीठाच्या गेल्या वर्षभरातील शैक्षणिक प्रगती, नाविन्यपूर्ण उपक्रम व विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय स्तरावरील यशाचा आढावा सादर केला.
दीक्षांत मिरवणुकीत विद्यापीठाचा मानदंड उपकुलसचिव (अ. का.) सुनील हतागडे यांनी धारण केला होता. राष्ट्रगीत, राज्यगीत व विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. विविध विद्याशाखांच्या अधिष्ठात्यांच्या विनंतीनुसार कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या.
या समारंभात कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी आणि प्रा. गणेशन कन्नबीरन यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. सुवर्णपदक विजेत्यांची नावे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांनी जाहीर केली.

22
1927 views