logo

कोकणात ठाकरेंचा भ्रम कोसळला; ‘सामंत पर्वा’चा राजकीय उदय ; स्थानिक स्वराज्य निवडणुकांतून कोकणाने दिला स्पष्ट कौल ; कोकणाचा चेहरा म्हणजे उदय सामंत

सन २०२२ मधील शिवसेनेतील फाटाफुटीनंतर कोकणातील पहिलीच निर्णायक राजकीय लढाई नुकतीच पार पडली आणि या लढाईत कोकणाने कोणाच्या बाजूने कौल दिला, याबाबत आता कोणतीही शंका उरलेली नाही. नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या निकालांनी ठाकरेंच्या भावनिक राजकारणाचा कोकणात अंत केला असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कोकणाने स्पष्ट, ठाम आणि निर्णायक कौल दिला आहे.
ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक नव्हती, तर “खरी शिवसेना कोणाची?” या प्रश्नावर कोकणाने दिलेला सार्वमताचा निकाल होता. आणी या निकालाचा निर्विवाद नायक ठरला — उदय सामंत.
कोकण हा शिवसेनेचा जन्मदाता बालेकिल्ला. परंतु हा किल्ला टिकवायचा असेल, तर केवळ आठवणी, जुन्या भाषणांचे व्हिडिओ आणि भावनिक साद पुरेशी नसते, हे या निवडणुकीत ठाकरेंना पुन्हा एकदा कळून चुकले. त्याउलट, उदय सामंत यांनी संघटन, रणनीती आणि जमिनीवरचे वास्तव यांची सांगड घालत कोकणात शिवसेनेचा भगवा अधिक घट्ट रोवला.
निवडणूक जाहीर होताच उदय सामंत मैदानात उतरले. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या मतमोजणीपर्यंत ते कोकणात अक्षरशः फिरत राहिले. सभा, बैठका, कार्यकर्त्यांचे मनोबल, स्थानिक गणिते, मित्रपक्षांशी समन्वय — प्रत्येक पातळीवर एकाच व्यक्तीची छाप ठळक दिसत होती.
रायगड जिल्ह्यात खोपोली, श्रीवर्धन आणि महाड येथे शिवसेनेने राष्ट्रवादीचे सर्व गणित कोलमडून टाकले. सुनील तटकरे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला या भागात धक्का देणे, ही केवळ निवडणूक जिंकण्याची बाब नव्हे, तर राजकीय वर्चस्वाची घोषणा होती.
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण नगराध्यक्षपदाची लढत ही प्रतिष्ठेची होती. ती लढत जिंकत शिवसेनेने भास्कर जाधव यांना थेट चितपट केले. गुहागर व देवरुख येथे भाजपाला सन्मान देत, महायुतीची शिस्त आणि सामंजस्य उदय सामंत यांनी दाखवून दिले.
रत्नागिरी नगरपरिषदेत ३२ पैकी २९ जागांवर महायुतीचा विजय म्हणजे विरोधकांसाठी राजकीय इशाराच होता. सौ. शिल्पा सुर्वे यांना मिळालेले दहा हजारांचे मताधिक्य म्हणजे शहरात विरोधकांची उरलेली पकडही संपल्याचा पुरावा आहे.
लांजा आणि राजापूरमध्ये सामंत बंधूंनी शिवसेनेची ताकद दुपटीने वाढवली. राजापूरमध्ये पूर्वी केवळ दोन नगरसेवक असलेली शिवसेना आज दहावर पोहोचली आहे, हा आकडा बोलका आहे. इथे पराभव झाला असला, तरी राजकीय दिशादर्शक बाण शिवसेनेच्या बाजूनेच आहे.
सिंधुदुर्गात कणकवलीतील शहर विकास आघाडी, मालवणमधील यश, आणि एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा — या साऱ्या घडामोडींच्या मागे उदय सामंत यांची रणनीती होती, हे आता लपून राहिलेले नाही. वेंगुर्ला आणि सावंतवाडीतील निसटते पराभवही एकूण चित्र बदलू शकत नाहीत.
राजकीय वास्तव म्हणजे असे की या निवडणुकांनी एक गोष्ट निर्विवादपणे स्पष्ट केली आहे —
कोकणाला आता “भावनिक वारसा” नव्हे, तर “काम करणारे नेतृत्व” हवे आहे.
आज कोकणात शिवसेनेचा चेहरा, आवाज आणि निर्णयकर्ता म्हणून उदय सामंत यांचे नाव सर्वात पुढे आहे. त्यामुळेच “कोकणचे नेते” ही ओळ आता उपमा राहिलेली नाही, तर राजकीय सत्य बनली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे जाणाऱ्या राजकारणात, कोकणातून उभा राहिलेला हा कौल महायुतीसाठी संजीवनी ठरणार आहे.
आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे — कोकणात शिवसेनेचा भगवा आता सामंतांच्या नेतृत्वाखालीच फडकणार आहे.

14
699 views