logo

आता रेल्वेचा प्रवासही महागणार! स्लीपर ते एसी कोचच्या तिकीट दरात वाढ, २६ डिसेंबरपासून नवे दर लागू

देशात वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांची कंबरड मोडलेली असतानाच आता रेल्वे प्रवासही महाग होणार आहे. भारतीय रेल्वेने मेल व एक्सप्रेस गाड्यांच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, ही दरवाढ २६ डिसेंबरपासून लागू होणार आहे. रेल्वे बोर्डाने यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केले असून, लांब पल्ल्याच्या प्रवासावर या निर्णयाचा परिणाम होणार आहे.
रेल्वे विभागाच्या माहितीनुसार, २१५ किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी प्रति किलोमीटर एक पैशाने भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे स्लीपर कोचपासून ते फर्स्ट एसीपर्यंतच्या तिकीट दरात १० ते ५० रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ मुख्यतः मेल, एक्सप्रेस आणि काही सुपरफास्ट गाड्यांवर लागू करण्यात आली आहे.
सध्या लखनौ मेलच्या फर्स्ट एसीचे तिकीट १,९७० रुपये असून ते २६ डिसेंबरनंतर १,९८० रुपये होणार आहे. त्याचप्रमाणे सेकंड एसीचे तिकीट १,१८० रुपयांवरून १,१९० रुपये, थर्ड एसीचे ८४५ रुपयांवरून ८५५ रुपये, थर्ड एसी इकॉनॉमीचे ७५८ रुपयांवरून सुमारे ७९५ रुपये, तर स्लीपर कोचचे भाडे ३३० रुपयांवरून ३४० रुपये होण्याची शक्यता आहे.
शताब्दी एक्सप्रेसच्या चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासच्या तिकीट दरातही वाढ होणार आहे. सध्या चेअर कारसाठी २,१६५ रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी १,४०५ रुपये आकारले जात असून, हे दर अनुक्रमे २,१७६ रुपये आणि १,४१६ रुपये होणार असल्याची माहिती आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये लखनौहून मुंबईला धावणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या तिकिटांमध्येही वाढ होणार आहे. या गाडीचे फर्स्ट एसी भाडे ४,१०५ रुपये, सेकंड एसी २,४४४ रुपये, थर्ड एसी १,७२४ रुपये आणि स्लीपर कोचचे भाडे ६७९ रुपये होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बेगमपुरा एक्सप्रेसच्या फर्स्ट एसीचे भाडे ३,२३० रुपये, सेकंड एसी १,९३० रुपये, थर्ड एसी १,३७५ रुपये आणि स्लीपर कोचचे भाडे ५४० रुपये होणार आहे.
या भाडेवाढीमुळे रेल्वेला सुमारे ६०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, दैनंदिन प्रवासी, अल्प पल्ल्याचा प्रवास करणारे प्रवासी तसेच लोकल (उपनगरीय) रेल्वे सेवा आणि मासिक पासधारकांना या दरवाढीचा कोणताही फटका बसणार नाही, असे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे.
तसेच, २६ डिसेंबरपूर्वी ज्यांनी तिकिटांचे आरक्षण केले आहे, अशा प्रवाशांकडून वाढीव भाडे आकारले जाणार नाही, अशी माहितीही रेल्वे प्रशासनाने दिली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, यंदा रेल्वे तिकिटांच्या दरात ही दुसरी वाढ असून, यापूर्वी १ जुलै रोजी मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या भाड्यात प्रति किलोमीटर एक पैशाची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे नव्या वर्षाच्या तोंडावर रेल्वे प्रवाशांवर आणखी एक आर्थिक भार पडणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

11
986 views