
सार्वजनिक आरोग्य सेवेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गरजेचा ;
‘एआय’मुळे आरोग्य सेवा अधिक सुलभ होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे काळाची गरज आहे. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ (AI) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक सुलभ, वेगवान आणि गुणवत्तापूर्ण होऊ शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबई येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आयोजित सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल घडवता येऊ शकतो. रुग्णनोंदणी, उपचार प्रक्रिया, आरोग्य संस्थांचे मूल्यमापन, सेवा गुणवत्तेचे निरीक्षण तसेच तक्रार निवारण यांसारख्या बाबींमध्ये एआयचा प्रभावी वापर केल्यास नागरिकांना वेळेवर आणि अचूक आरोग्य सेवा मिळू शकते. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंतही दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत ‘समग्र’ संस्थेच्या वतीने आरोग्य सेवा बळकटीकरणासंदर्भात सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये आरोग्य संस्थांचे स्टार रेटिंग, आरोग्य सेवेचा आढावा, आरोग्य हेल्पलाइन प्रणाली, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच सेवांचे नियमित मूल्यमापन (रिव्ह्यू) या विषयांचा समावेश होता.
बैठकीदरम्यान ‘आपले गाव, आरोग्य संपन्न गाव’ योजना अधिक प्रभावीपणे राबविणे, पॅलियेटिव्ह केअर सेवा विस्तार, सिकलसेल आजारावरील उपाययोजना, वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सुलभ करणे, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समावेशन जलद करण्याबाबत मागण्या मांडण्यात आल्या. याशिवाय आयुष संचालक, प्रशिक्षण संचालक तसेच नर्सिंग क्षेत्रासाठी स्वतंत्र पदनिर्मितीचीही मागणी करण्यात आली.
या सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
या बैठकीस मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, ‘समग्र’ संस्थेचे प्रतिनिधी गौरव गोयल तसेच सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.