logo

पदोन्नती मिळालेले चार तहसीलदार कार्यमुक्त



पालिका निवडणुकींमुळे पदभार होता कायम

जळगाव : तहसीलदार पदावरून उपजिल्हाधिकारी व नायब तहसीलदार पदावरून तहसीलदारपदी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांना पालिका निवडणूक आटोपताच कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पालिका निवडणुकीत निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त असल्याने पदोन्नतीनंतरही कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. महसूल विभागाच्या निर्देशानुसार या अधिकाऱ्यांना पालिका निवडणुका आटोपल्यानंतर कार्यमुक्त करावे, असे आदेश होते.

मात्र निवडणूक शाखेतील तहसीलदार किशोर कदम यांना धुळे येथे भूसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली होती. त्यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी नसल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते. तर महापालिकेच्या संजय गांधी निराधार योजना विभागाचे तहसीलदार अनिल पूरे, रावेरचे बंडू कापसे, एरंडोलचे प्रदीप पाटील यांच्याकडे पालिका निवडणुकीचे कामकाज असल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते.

त्यामुळे नायब तहसीलदार पदावरून तहसीलदारपदी पदोन्नती मिळालेल्या रुपाली काळे यांना मनपाच्या संजय गांधी निराधार योजना विभागात रुजू होता आले नव्हते.

या चारही अधिकाऱ्यांच्या कार्यमुक्तीचा प्रस्ताव सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत

नवीन अधिकारी येणार

एरंडोल तहसीलदारपदी धुळ्याचे गोपाळ पाटील यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. रावेरला याआधीच अन्य अधिकारी रुजू झाले आहेत. काळे या पुरे यांचा पदभार स्वीकारतील. नव्याने नियुक्ती मिळालेले अधिकारी दोन दिवसांत रुजू होणार आहेत.

13
734 views