
आळंदी कुंडलिकेच्या मंदिर परिसरात गटारपाणी मिसळण्याचा प्रकार; प्रशासनाचे गंभीर दुर्लक्ष
तीर्थक्षेत्र आळंदीतील कुंडलिकेच्या मंदिर परिसरात देवस्थान व इतर गटारांचे सांडपाणी थेट एकमेकात मिसळत असून ते नदी पात्रात जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक व भाविकांकडून केला जात आहे.
कुंडलिकेच्या मंदिरास धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व असताना, अशा प्रकारे सांडपाणी मिसळणे हे आळंदीच्या पावित्र्यावर थेट आघात करणारे आहे. यामुळे नदीचे पाणी दूषित होत असून भाविकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
याशिवाय, नदी पात्रात बेकायदेशीरपणे सुरू असलेली कामे त्वरित बंद करण्यात यावीत, अशी जोरदार मागणी होत आहे. या कामांमुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणात माती साचली असून, ती माती थेट नदीच्या प्रवाहात जमा झालेली आहे. त्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बाधित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
नदी पात्रातील बेकायदेशीर कामांमुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून, भविष्यात पूरस्थिती उद्भवण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. तरीदेखील संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कुंडलिकेच्या मंदिर परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन तात्काळ सुधारावे, नदी पात्रातील सर्व बेकायदेशीर कामे थांबवावीत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाविक, नागरिक आणि पर्यावरणप्रेमी संघटनांकडून केली जात आहे.