अंगणवाडी इमारतीची दुरवस्था; बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
भामरागड तालुक्यातील मर्दमालेंगा येथील नविन अंगणवाडी इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जि.प. (बांध) उपविभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना सन 2023-24 अंतर्गत उभारण्यात आलेल्या या इमारतीच्या जमिनीवर ठिकठिकाणी सिमेंटचा थर निघून माती दिसू लागली आहे.अवघ्या काही काळातच फरशी उखडल्याने बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. लहान बालकांसाठी असलेल्या अंगणवाडीमध्ये अशी परिस्थिती असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. फरशी तुटलेली असल्यामुळे लहान मुलांना दुखापत होण्याचा धोका असून स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.सदर इमारतीच्या बांधकामाची गुणवत्ता तपासून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.