logo

जिजाऊनगरवासीयांचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय



जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अनेक वर्षांपासून दुर्लक्ष

जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते, गटारी, पथदिवे, अस्वच्छता यासह विविध नागरी समस्यांनी त्रस्त असलेल्या जिजाऊनगरवासीयांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, सुविधांची पूर्तता होत नाही तोपर्यंत मतदान करणार नसल्याचा निर्णय या भागातील रहिवाशांनी घेतला आहे.

गिरणा पंपिंग रस्त्यावर असलेल्या जिजाऊ नगर परिसरात गेल्या २५ वर्षांपासून नागरी वस्ती वाढली आहे. या भागातील रहिवासी नियमित कराचा भरणा करतात; मात्र सुविधांची येथे कमतरता आहे.

या भागात पक्के रस्ते, गटारी, पथदिवे, कचरा व्यवस्थापन, खुल्या भूखंडात वाढलेली अस्वच्छता, मोकाट कुत्र्यांचा त्रास यासह विविध समस्यांना नागरिक अनेक वर्षांपासून तोंड देत आहेत.

याविषयी या पूर्वी अनेकवेळा आमदार, नगरसेवकांसमोर समस्यांचा पाढा वाचला व महापालिकेकडेही पाठपुरावा करण्यात आला; मात्र कोणाकडूनही या भागाकडे लक्ष दिले गेले नाही. तसेच जिजाऊनगरचा काही भाग सावखेडा ग्रामपंचायतमध्येही येतो.

पाठपुरावा करूनही नागरी सुविधा नाहीत

ग्रामपंचायतही लक्ष देत नसल्याचे या भागातील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी आता थेट मतदानावर बहिष्कार टाकण्याचा टाकण निर्णय घेतला आहे. जोपर्यंत मुलभूत नागरी सुविधा मिळत नाही, तोपर्यंत मतदान करणार नाही, असा निर्धारच या भागातील रहिवाशांनी केला आहे. तसे निवेदनदेखील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून रहिवाशांनी यापूर्वी वारंवार संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला परंतु, त्यांच्या निवेदनांची दखल घेण्यात आलेली नाही

0
24 views